गुरुवार, ३ मे, २०१२

“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥
या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत नामदेव यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने ह्या ब्लॉगने आज एक लाख वाचकांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतात असलेल्या विषमतावादी वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात मराठा-बहुजनांच्या अनेक महापुरुषांनी कार्य केले. जैन धर्माच्या स्थापनेपासून ते शिवधर्माच्या प्रकटनापर्यंत अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. त्या संघर्षात सत्यशोधक नेहमीच आपले योगदान देत राहील. बर्‍याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जात प्रबोधनाचे काम सलग तिसर्‍या वर्षीही सुरु ठेवल्याचा आनंद मनात आहे. जगातील १० देशांमधून हा ब्लॉग वाचला गेला. ६३% वाचक हे सर्च इंजिनच्या माध्यमातून ब्लॉगपर्यंत पोचले. फेसबुकच्या माध्यमातून तर आमच्या हातात एक नवे माध्यमच लागले आहे. ब्राम्हणी प्रचार-प्रसार माध्यमे इथे चालणार्‍या बहुजन चळवळीचे काम हायलाईट करत नाहीत. फेसबुकच्या माध्यमातून हा ब्लॉग आणखी जास्त वाचकांपर्यंत पोचवता आला.
ब्लॉग चालवताना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचा अधिक कटू अनुभव आला. वेळ आली कि एकजात सगळे चांगले-वाईट ब्राम्हण कसे एकत्र येतात याचा अनुभव आला. ते त्याच्या चुका मान्य करत नाहीतच पण चुका सांगणार्‍यालाच गुन्हेगार घोषित करून मोकळे होतात. सुरुवातीला ब्लॉग लोकांपर्यंत पोचण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व हि साईट एकमेव माध्यम म्हणून वापरली. पण तेथील सगळ्या ब्राम्हणांनी (लोकशाहीच्या गप्पा करणार्‍या!) माझा ब्लॉग बॅन करायला साईट मालकाला भाग पाडले. जेम्स लेन प्रकरणी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला सांगणार्‍या पंडित अटल बिहारीचे समर्थक भाऊबंद असे वागताना पाहून मजा वाटली व चीडही आली. त्यामुळे मला सर्च इंजिन ओप्टीमायजेशन शिकता आले आणि माझी वाचकसंख्या टिकून राहिली. ब्लॉगची गुगल पेजरँक ३ आहे. गुगल, वर्डप्रेस, व इतर सर्व ओपन सोर्स (बौद्धिक नियंत्रण मुक्त) साईट्सची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच व्यक्तीस्वातंत्र्य आम्हाला इंटरनेटवर उपभोगण्यास मिळते.
युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी शेती आणि क्रिकेट याच्या पलीकडच्या जगात आम्हाला डोकावायला शिकवले. आणि कधी नव्हे ती मराठयांची पोरे विचार करायला लागली. फुकट दिलेले पुस्तक न वाचणारे पुस्तक विकत घेऊन वाचायला लागले, लिहायला लागले. आणि महाराष्ट्रात नव्हे देशात होणार्‍या दंगली बंद झाल्या. आरक्षण म्हणजे कुबड्या समजणारा समाज आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समजून घेण्याइतपत प्रगल्भ झाला. गेल्या हजारो वर्षात हार न पाहिलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला दादू कोंडदेवच्या माध्यमातून थेट हादरा दिला.
हा ब्लॉग चालवताना अनेक मित्रांनी व चळवळीतील सहकार्‍यांनी मदत केली. माझा बंधुमित्र निखील देशमुख (औरंगाबाद) याने ब्लॉग satyashodhak.com करायला व स्वतंत्र सेल्फ होस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी मदत केली. प्रकाश पोळ (कराड) यांनी चर्चा करून लेख आणखी चांगले होण्यास मदत केली. डॉ. बालाजी जाधव (औरंगाबाद), नितीन सावंत (परभणी), विकासराव चव्हाण (मुंबई), विशाल भोसले (लातूर), भैय्या पाटील (पुणे), अभय पाटील (बुलडाणा), अमरजित पाटील (पंढरपूर), अनिल माने (बारामती), पुरुषोत्तम जाधव (बीड), प्रदीप इंगोले (हिंगोली), संजीव भोर (अहमदनगर), संतोष गायधनी (नाशिक), सतीश काळे (पिंपरी-चिंचवड), प्रकाश पिंपळे (मुंबई), सुनील चौधरी (जळगाव) व अशा अनेक चळवळीतील हितचिंतक व सहकार्‍यांनी चर्चा करून ब्लॉग अधिक चांगला होण्यास मदत केली. इतःपर त्यांचे आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.
शेवटी या देशात फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत समाजरचना निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन देतो. व हा छोटासा लेख पूर्ण करतो.
जय जिजाऊ!
-विनीत
*(सत्यशोधक.कॉम   वरून साभार )*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.