चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ मे, २०१२

भारतीय संस्कृतीची जाहीर विटंबना करणारा खोटारडा सिनेमा- अजिंठा


Dhananjay Aditya द्वारा 

खोटी, अर्धसत्य, विकृत व बनवाबनवीची माहिती लोकांसमोर आणून मूळच्या भारतीय समाज, संस्कृती, तत्वज्ञान यांची विटंबना आणि विडंबना करण्याचा आक्षेपार्ह, भयानक आणि अश्लाघ्य प्रयत्न नितीन चंद्रकांत देसाई यांच्या “अजिंठा” या चित्रपटाने चालवला आहे.
खरेतर अत्यंत साधारण आणि सुमार दर्जाच्या तकलादू कथेमध्ये खोट्या, हास्यास्पद, विचित्र अशा गोष्टी घुसडून या चित्रपटाचा डोलारा उभारला गेला आहे. या चित्रपटाची थोडक्यात कथा अशी-
अजिंठ्यातील अप्रतिम चित्रे खराब व नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीतर्फे रॉबर्ट गिल यांची १८४५ मध्ये नेमणूक करण्यात आली. त्यावेळी ते ब्रिटीश सैन्यात मद्रास येथे तैनात होते. ते चांगले, प्रशिक्षित तसेच हौशी चित्रकार होते. ते अजिंठा येथे आल्यावर त्यांचे व पारो या बंजारा तरुणीचे प्रेम जुळते. रॉबर्ट इंग्लंडला जातो व त्यादरम्यान गर्भवती असलेल्या १८५६ मध्ये पारोचा खून होतो. रॉबर्ट तिची समाधी बांधतो. प्रेमाने विमनस्क व निराश होऊन रॉबर्ट ऊर्वरित आयुष्य अजिंठा येथेच कंठतो. (चित्रपट संपला.)
२२ प्रतिज्ञाच्या विरोधातील षड्यंत्र 
“गौतम बुद्ध हे रामासारखे देवाचा अवतार होते” अशा अर्थाचे निवेदन या चित्रपटात विश्वंभर शास्त्री नावाचा पुण्याचा ब्राह्मण करतो. प्राचीन काळी गौतम बुद्ध हे विष्णूचा रामासारखा अवतार असल्याची खोटी व खोडसाळ कथा पसरवून भारतातून बौद्ध धम्माचा नयनाट करण्यात आला. या सिनेमातून तोच घातक, विचार लोकांच्या डोक्यात पुन्हा घुसवण्याचा बदमाश व लबाड प्रयत्न मुद्दामहून करण्यात आला आहे. सिनेमातील हा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाच्या विरोधातील भयानक षड्यंत्र होय. “देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हो खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञामध्ये स्पष्ट म्हटले आहे. या चित्रपटातून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांना चिरडण्याचा निंदनीय प्रकार करण्यात आला आहे.
बौद्ध संस्कृतीची विटंबना 
या चित्रपटात ठिकठिकाणी बौद्ध संस्कृतीची शक्य तितकी विटंबना व नालस्ती करण्याचा प्रकार करण्यात आला आहे.
अजिंठा येथील बौद्ध लेण्यामध्ये मध्यभागी अग्नी (यज्ञाचे प्रतिक) ठेवून त्याभोवती लग्नाचे सात फेरे घेताना दाखवले आहे. या लेणी वास्तविकतः बौद्ध विहारे होत. बुद्ध विहारांमध्ये या प्रकारचे लग्न मुळीच लावले जात नाही. बुद्ध विहारात सात फेरे दाखवणे म्हणजे बौद्ध परंपरेचा चुराडा करणे होय; तसेच बौद्धांवर जबरदस्तीने ब्राह्मणी विवाह परंपरा लादणे होय. ज्या गौतम बुद्धाने यज्ञ संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात उच्चाटन केले त्या बुद्धाच्या विहारातच यज्ञ दाखविणे म्हणजे बुद्धाची घोर विटंबना होय.
बौद्ध समाजात होळी हा धिक्कारणीय प्रकार मानला जातो. होळी हा बौद्धांचा सणही नाही. असे असताना बौद्ध लेण्यांमध्ये होळीचे/शिमग्याचे रंग सर्वत्र उधळलेले दाखवले आहे. हिरोईन तर त्या लेण्यांमध्ये त्या रंगानी नखशिखांत भरलेली दाखवलेली आहे. याप्रकारे बौद्ध संस्कारांची बेइज्जती केली आहे.
होळी, शिमगा, रंग उधळणे, नाच-गाणी, रोमांस यासाठी ही प्राचीन, पुरातन लेणी नाहीत. पण या सिनेमात हे प्रकार अजिंठा लेण्यात सर्रास दाखवून भारतीय कला व संस्कृतीचेही धिंडवडे उडवले आहेत. या लेण्या म्हणजे भारताची सांस्कृतिक धरोहरे (हेरिटेज) होत हे या बाबतीत प्रकर्षाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
रॉबर्टच्या चित्रांमुळे बुद्धाच्या संदेशाची जगाला ओळख होईल, असे विश्वंभर शास्त्रींच्या तोंडून वदवले आहे. खरेतर बुद्धाच्या विचारांची ओळख जगाला सुमारे दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच झाली होती, असे असताना जातक-कथांमधील चित्रांच्या आधारे व रॉबर्टच्या चित्रांनी जगाला बुद्धाचा संदेश कळेल असे म्हणणे म्हणजे निव्वळ खोडसाळपणा होय. तसेच बुद्ध धम्माच्या इतिहासाची वाट लावणे होय. आणि निव्वळ जातक कथांमधून बुद्धाचा संदेश जगाला कळेल असे भासवणे हेही चुकीचे आहे.
बंजारा संस्कृतीची विटंबना 
पारो ही बंजारा तरुणी होती. बंजारा समाजामध्ये पारोवरील लोकगीतेही आहेत. ना. धो. महानोरांच्या ३२ वर्षापूर्वीच्या “अजिंठा” या पुस्तकातही पृष्ठ ८ वर विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साक्षीने पारो ही बंजारा होती असे स्पष्ट म्हटले आहे. सदर सिनेमाच्या निर्मात्यानेही ती बंजारा होती असे अनेक ठिकाणी दर्शविले आहे. त्यांच्या वेब-साईट वर, फेसबुक वरील पेजवर ती बंजारा असल्याचे उल्लेख आहेत. या सिनेमातही आधी एका गीतात बंजारा हा उल्लेख होता, तसेच बंजाराचे धर्मगुरू सेवालाल यांच्यावरील गीतही होते. असे असतानाही सिनेमातील पारो व तिच्या लोकांची संस्कृती ही बंजारा संस्कृतीची विटंबना व बदनामी करणारी दाखवण्यात आली आहे. याविरोधात आवाज उठायला लागल्यावर मात्र निर्मात्यांचे धाबे दणाणले व त्यांनी बंजारा हा उल्लेख असलेले गाणे व सेवालाल यांच्या जयघोषाचे गाणे बेमुर्वतपणे कापून टाकले. बंजारा संस्कृतीच्या तरुणीला या प्रकारे बिना-संस्कृतीची दाखविण्याचा विचित्र व अपमानजनक प्रकार करण्यात आला. लोकमान्य टिळकांवर सिनेमा काढायचा व त्यांना त्यांच्या संस्कृतीचे  दाखवायचे नाही, त्याचे कपडे, परिसर, लोक काहीतरी भलतेच दाखवायचे ... असे केल्यास चालेल काय? त्यामुळे मोठाच गोंधळ माजणार नाही काय?
पारोची वेशभूषा, केशभूषा ही निश्चितच बंजारा समाजाला मुळीच न शोभणारी दाखवली आहे. अशा प्रकारच्या तोकड्या व वेगळ्याच वेशात त्या वेळची व आताचीही बंजारा तरुणी मुळीच नसते. तिचा दाखवलेला परिसरही बंजारा समाजावर अन्याय करणारा आहे.  बंजारा समाजाने ब्राह्मणांना आपल्यापासून दूर ठेवले होते. परंतु या सिनेमात ब्राह्मण विश्वंभर शास्त्री याला बंजारांच्या डोक्यावर अलगद बसवून ठेवले आहे.
बंजारा समाज हा बौद्ध धम्माचा संरक्षक व प्रसारक राहिला आहे. अशा परिस्थितीत बंजारा तरुणी पारो ही बुद्ध मूर्तीसमोर फक्त वक्षभाग व कटीभाग झाकलेल्या व इतर सारे शरीर अनावृत्त असलेल्या स्वरुपात पूजा, रोमांस व चाळे चालवीत असेल- असे घडणे शक्य तरी आहे काय? पण या सिनेमात हे प्रकार पुन्हा पुन्हा दाखवण्यात आले आहे. बंजारा तरुणी (की लोक) बुद्धाच्या समोर असे वावरत होते असे दाखवून निर्मात्याला काय साधायचे आहे? यातून या दोन समाजामध्ये एक दुसऱ्यात वादंग व भेद माजवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिसते.
बंजारा समाजातील वस्तीचा प्रमुख (तांड्याचा नायक) हा लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडलेला असतो. त्याने अशोभनीय, कलंकित, नियमबाह्य, अनैतिक वर्तन केल्यास समाज त्याला जाहीरपणे खाली खेचतो, शिक्षा देतो आणि दुसऱ्या चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीला नायक बनवतो. परंतु या सिनेमात सारे विपरीतच दाखवले आहे! त्यातील नायक चक्क गुंड दाखवला आहे. तो पारोवर बलात्कार करतो, दादागिरी करतो, नायक म्हणून कोणतीही जबाबदारी पार पाडत नाही तरीही बंजारा समाज त्याला नायक पदावर चक्क १२ वर्षे राहू देतो! १२ वर्षानंतर तोच नायक पारो गर्भवती असताना तिचा खून करतो! हे असे दाखवणे मात्र अतीच झाले. (ना.धो. महानोर यांच्या पारो वरील पुस्तकात मात्र असे नाही.) याप्रकारे या चित्रपटाने बंजारा समाजाची अब्रू मात्र अक्षरशः जगाच्या वेशीवर टांगली आहे.
इतिहासची ऐसी तैसी
“ऐतिहासिक घटनेवर आधारित खरी कहाणी” असे बिरूद मिरवणाऱ्या या चित्रपटाने ऐतिहासिक तथ्यांची वारेमाप मोडतोड केली आहे. अजिंठ्याला रॉबर्ट गेला तेव्हा तो कॅप्टन पदावर होता, मेजर पदावर नव्हता. रॉबर्ट गिलचे आगमन (१३ मे १८४५) व प्रस्थान हे होळीच्या वेळी झालेले नव्हते. तरीही होळीला त्या वेळी व पुन्हा पुन्हा घुसडण्यात आले आहे. रॉबर्ट हा चांगला फोटोग्राफरसुद्धा होता. त्याने पुरातन वास्तूंचे काढलेले शेकडो दुर्मिळ फोटो उपलब्ध आहेत. परंतु सिनेमात ते न दाखवून रॉबर्ट वरही अन्याय केला आहे. अजिंठ्यात गिल एका महालात राहत होता. तो या महालात राहत होता तर त्याची प्रेयसी शेवटपर्यंत झोपडीत राहत होती हे न पटणारे आहे.
रॉबर्ट गिल अजिंठ्याला आले (१८४५) त्या-आधी त्यांचे फ्रान्सिसी या महिलेसोबत २५ मे १८४१ रोजी लग्न झाले होते व त्यांना १८४२ व १८४३ साली दोन मुलेही झाली होती. रॉबर्ट अजिंठ्याला असताना म्हणजे पारोच्या सहवासात असताना फ्रान्सिसी भारतात होती व तिला या दरम्यान १८४७ व १८४९ मध्ये अजिंठ्यापासून ५० किमी अंतरावर जालना येथे पुन्हा दोन मुलेही झाली होती. अजिंठ्याला पारोनंतर रॉबर्टला अनी नावाची एक बायको होती. तिच्यापासून त्याला मुलगीही झाली होती. तथापि “अव्यक्त प्रेमकहाणी” बनवताना या अत्यंत महत्वाच्या तथ्यांना सिनेमात मुद्दाम दाखवले नाही. याप्रकारे खोटेपणा करून प्रेक्षकांची घोर फसवणूक या चित्रपटात करण्यात आली आहे.
पारो ही रॉबर्टला नैसर्गिक रंग बनवून द्यायची व त्याचा उपयोग करून तो धोतराच्या कॅनव्हासवर चित्र काढू लागला. हा सिनेमातील कल्पनाविलास हास्यास्पद आहे. ब्रिटिशांच्या अनेक प्रांतातून सर्वेक्षण करून त्याला नियोजनबद्ध रीतीने या कार्यासाठी नियुक्त केले होते. त्याच्यासाठी रंग व कॅनव्हास इंग्लंडवरून येत होते. एका चित्रासाठी काही महिने लागायचे. तेवढा धीर रॉबर्टजवळ होता. त्यामुळे चिरकाल टिकतील अशी चित्रे धोतरावर व साध्या रंगानी तो काढेल असे वाटत नाही. तसे एकही चित्र त्याने काढले होते याचा उल्लेख नाही. उलट त्याने काढलेली सर्व ३० चित्रे ही प्रमाणित (standard) प्रकारातीलच होती. पावसाळ्याचे ३ महिने वगळता लगेच सप्टेंबर १८४५ मध्ये त्याला रंगसाहित्य मिळाले होते. पारोसोबत रॉबर्टची जवळीक दाखवण्यासाठी ही रंगाची थिअरी कृत्रिम रीतीने रंगवण्यात आल्याचे दिसते.
पारोच्या समाधीवर To the memory of my beloved Paroo who died 23rd May 1856. – W. Heron sculptor  असे लिहिण्यात आले आहे. पण चित्रपटात डब्ल्यू. हेरॉन हे नाव पद्धतशीरपणे वगळण्यात आले आहे. पारोचा मृत्यू १८५६ साली आलेल्या प्लेगमध्ये झाला होता. परंतु सिनेमात मात्र तिच्या समाजाच्या नायकाकडून तिचा गर्भारपणी खून झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
पारोच्या मृत्युनंतर रॉबर्ट अत्यंत निराश व विमनस्क होतो व अजिंठ्याला पडून राहातो- हे सिनेमातील कथनही न पटणारे आहे. पारोच्या मृत्युनंतर तो अनी या महिलेसोबत अजिंठा येथे संसारिक जीवन व्यतीत करतो, वेगवेगळया प्रांतात फिरतो, धुमधडाक्याने फोटोग्राफी करतो. १८६९ साली त्याला अजिंठा सोडून जायचे होते. परंतु ब्रिटीश सरकारने त्याला अजिंठ्याचे व इतर फोटो घेण्याचे काम सोपवले होते; ते पूर्ण करणे आवश्यक होते.
या चित्रपटात याशिवाय इतर अनेक ठिकाणी अशा उणीवा, आक्षेपार्ह बाबी, बनवाबनवी, लबाडी, खोटारडेपणा दिसून येतो. याप्रकारे बौद्ध व बंजारा संस्कृतीची तसेच भारतीय संस्कृतीची विटंबना व विडंबना करणारा, ऐतिहासिक सत्याची मोडतोड करणारा अजिंठा हा एक तकलादू चित्रपट आहे. या सिनेमाच्या निमित्ताने असला निंदनीय प्रकार केल्याबद्दल त्यासाठी जबाबदार असलेल्यांनी जाहीर माफी मागावी व हा चित्रपट पूर्णपणे डबाबंद करण्यात यावा.
-    धनंजय आदित्य.

वस्तीमध्ये हा कसले बुद्ध-तत्वज्ञान सांगणार?


होळीच्या रंगात न्हाऊन निघालेली व अजिंठा लेण्यात बेधुंद पडलेली नायिका पारो (सोनाली कुळकर्णी)
अजिंठा चित्रपटात सोनाली कुळकर्णी (पारोच्या भूमिकेत) बंजारा तरुणी अशा वेशात असते ?
अजिंठा चित्रपटात अजिंठ्याच्या लेण्यात असा अग्नी (यज्ञ) पेटवून त्याभोवती असे सात फेरे घेत असताना दाखवले आहे. कोणत्या विहारात असे लग्न लावले जाते?

बुद्धमुर्तीसमोर तोकड्या वेशात सोनाली कुळकर्णी (पारोच्या भूमिकेत)
अजिंठ्यात गिल राहत असलेला महाल (पलेस). तो या महालात राहत होता तर सिनेमात त्याची प्रेयसी शेवटपर्यंत झोपडीत का दाखवली आहे?

मनुवादी षड्यंत्र हाणून पडू या. "अजिंठा सिनेमा" कायमचा गाडून 
टाकू या.

सोमवार, १४ मे, २०१२

अजिंठा


अजिंठा या चित्रपटावरील मिलिंद बनसोडे यांची फेसबुक वर त्यांनी टाकलेली प्रतिक्रिया -

"एका फडतूस प्रेम कहाणीद्वारे बुद्धांच्या विकृतीकरण दाखवून निर्मिला अजिंठा मराठी चित्रपट" 
नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजिंठा मराठी चित्रपट काल पाहिला.
त्यामध्ये पुष्कळ गोष्टी बुद्ध धम्माच्या विसंगत दाखविण्यात आलेल्या आहे.त्यापैकी आक्ष...ेपार्ह गोष्टी पुढीलप्रमाणे
१.राम,रहीम,बुद्ध हे एकच आहे हे विधान चित्रपटाच्या प्रारंभी करण्यात आले आहे.
२.सिद्धार्थ गौतमच्या जन्मापूर्वी जे बोधिसत्व होऊन गेले त्यांनी वानर म्हणून जन्म धारण केला होता.
३.भगवान बुद्ध हे महामानव(महापुरुष) असून त्यांना देव हे संबोधन वापरले गेले.
४.चित्रपटातील नायकाला जेव्हा चित्र रंगविण्यासाठी रंग मिळत नाही, तेव्हा त्याला असे सांगितले
 जाते की, भगवान बुद्धांच्या कृपेने सर्व शक्य होईल त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे ते चमत्कार करून ती समस्या दूर करतील 
५.बंजारा समाजची नायिका होळीच्या वेळी ज्या ठिकाणी सामुहिक नृत्य करते, त्याठिकाणी
भगवान बुद्धांची मुर्ती दाखविण्याचे नेमके प्रयोजन काय? होळी हा हिंदूचा सण आहे.
६.भगवान बुद्धांच्या समोर लेण्यामध्येच नायक व नायिका रोमान्स करतात,जर खरच नायिका बुद्धांची
निस्सीम अनुयायी असेल तर ती, लेण्यामध्ये हे कृत्य करेल काय?
७.चित्रपटात केवळ या लेण्याचे सौदर्य दाखविण्यापेक्षा नायिकेचे अर्धे उघडे शरीरच दाखविले आहे.
८.भगवान बुद्ध नायिकेला प्रकट होऊन दर्शन देताना दाखविले आहे,याचा अर्थ भगवान बुद्ध हे
दैवी शक्ती आहेत असे भासवायचे आहे.
९.भगवान बुद्धांच्या समोर नायक व नायिका हिंदू चालीरीती प्रमाने सप्तपदी चालून विवाह करतात
१०.नायकाला जो पंडित बुद्ध संस्कृतीची ओळख करून देतो,त्याचा पूर्ण पोशाख ब्राम्हण पद्धतीचा
आहे, तरी नायक त्याला भंतेजी म्हणून हाक मारतो.
सारांश, अश्या प्रकारे अजिंठा या चित्रपटात भगवान बुद्धांची ओळख ईश्वर म्हणूनच हेतुपुरस्पुर्वक
केल्याचे दिसून येते. भगवान बुद्ध हे स्वत : सांगत असताना की, मी इतर मनुष्य प्राण्याप्रमाणे मनुष्य आहे. मी मार्गदाता आहे,मोक्षदाता नाही.ईश्वर,आत्मा,पुनर्जन्म नाही.मी सांगितलेल्या धम्मात या गोष्टीला मुळीच स्थान नाही. केवळ या मानवी जीवनात सदाचरण करून मनुष्य सुखी होऊ शकतो,इतकी साधी व सोपी शिकवण भगवान बुद्धांची असताना त्यांना हिंदू धर्मातील ज्या गोष्टी कधीच मान्य नसताना त्याच त्यांच्यावर नावावर खपवून या चित्रपटात दिग्ददर्शकाने एकप्रकारे भगवान बुद्धांच्या विचारांचे विकृतीकरण केले आहे. या 
आधीही भारतभर ज्या बुद्ध लेण्या आहेत, त्यांची नावे बदलून या लोकांनी पांडवलेणी, कैलास लेणी इ. अशी हिंदुधर्मातील देवांची नावे दिली आहे.बुद्ध संस्कृतीचे विद्रुपीकरण हे लोक सतत कोणत्या न कोणत्या मार्गाने करत 
असतात. तरीसुद्धा आम्ही बुद्ध धम्माचे लोक या गोष्टीचा साधा निषेध नोंदवत नाही की, एकत्र येऊन याचा विरोध करत नाही. हीच आपल्या बुद्ध धम्मियांची खरी शोकांतिका म्हणावी लागेल,दुसरे काय ? 
मिलिंद बनसोडे (सारीपुत्र )
नाशिक मो.९९६०३२००६३.

रविवार, २९ एप्रिल, २०१२

ब्राह्मणांनी चित्रपटसृष्टीचाही खोटा इतिहास लिहिला

लोकमतमधील मूळ बातमी


राजा हरिश्‍चंद्र की पुंडलिक?
(29-04-2012 : 00:19:48)

- भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली?

मुंबई। दि. २८ (प्रतिनिधी)
भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली, राजा हरिश्‍चंद्र की पुंडलिक? भारतीय सिनेसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षाला सुरुवात करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच हा नवा वाद निर्माण झाला आहे.
धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा ३ मे १९१३ ला प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट असल्याचे मानले जाते, पण फाळकेंच्याही आधी भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब यांनी रोवल्याचा दावा करण्यात आला आहे. तोरणेंनी १८ मे १९१२ रोजी ‘पुंडलिक’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केल्याचा दावा मराठी सिनेनिर्माते तसेच इम्पाचे (इंडियान मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन) संचालक विकास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाकडे धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मूळचे सिंधुदुर्गकर असलेल्या दादासाहेब तोरणे यांनी नाटकाचे रेकॉर्डिंग केले. त्याची निगेटीव्ह लंडनहून डेव्हलप करून ‘पुंडलिक’ नावाने चित्रपट प्रदर्शित केला. १८ मे
१९१२ रोजी कोरोनेशन या मुंबईतील सिनेमागृहात ‘पुंडलिक’ दोन आठवडे चालला, पण त्याला सिनेमा म्हणून मान्यता मिळाली नव्हती असे सांगण्यात येते. वर्षभरानंतर दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा मूकपट ‘कोरोनेशन’मध्येच प्रदर्शित झाला. पाटील यांच्या म्हणण्यानुसार तोरणेंचे कार्य महान असून आजवर त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

हा स्टंट तर नव्हे ना?
तोरणे घराण्याचे कोणीही वारस सोबत नसताना, तोरणेंचा ‘पुंडलिक’ला १00 वर्षे पूर्ण व्हायला केवळ २0 दिवस शिल्लक असताना हा मुद्दा उपस्थित केल्याने याला पब्लिसिटी स्टंट म्हटले जात आहे. वर्षभरापूर्वी हा मुद्दा उपस्थित न करता शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या तसेच फिल्म सोसायट्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यावर हा मुद्दा उचलल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे.
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.