संभाजी ब्रिगेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संभाजी ब्रिगेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे युगपुरुषच

http://mahavichar.blogspot.in/2013/01/blog-post_21.html


शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे युगपुरुषच

-महावीर सांगलीकर 

मी नुकत्याच लिहिलेल्या संभाजी ब्रिगेड आणि मी या लेखाचे अनेकांनी प्रचंड स्वागत केले. पण त्याच वेळी हा लेख संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांचे विरोधक असणा-या लोकांना अजिबात आवडलेला नाही. विशेष करून मी खेडेकर साहेबांचा 'युगपुरुष' असा केलेला उल्लेख या विरोधकांना खटकला आहे.

कोहम महोक या टोपण नावाने लिहिणा-या लेखकाने माझ्या लेखाचा आणि संभाजी ब्रिगेड व खेडेकर साहेब यांच्याविषयी माझ्या मतांचा समाचार घेण्यासाठी आपल्या ब्लॉगवर एक ओपन लेटर लिहिले आहे. (शिवश्री महावीर सांगलीकरांना कोहमचे अनावृत्त पत्र (ओपन लेटर))   त्यातील मते ही संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांच्याविषयी राग असणा-यांची प्रातिनिधिक मते सौम्य भाषेत दिली गेली आहेत हे स्पष्ट दिसते. हे ओपन लेटर असल्यामुळे त्याचे ओपन उत्तर देणे मी आवश्यक समजतो.

पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे युगपुरुषच 
लेखकाचा मुख्य आक्षेप मी(ही) खेडेकर साहेबांना युगपुरुष समजतो या गोष्टीला आहे. लेखक म्हणतो, "मला सगळ्यात खटकला मुद्दा म्हणजे "एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे." - हा उल्लेख. एक ब्राम्हण म्हणून मी ह्या विधानाने का अस्वस्थ झालो असेन ते आपल्या लक्ष्यात आले असेल अशी अपेक्षा करतो. शिवरायांच्या बदनामीची केंद्रे ह्या पुस्तकातून खेडेकरांनी ब्राम्हण समाज, ब्राम्हण पुरुष आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्या विषयीचे विकृत लेखन ह्या आपल्या युगपुरुषोत्तमाने केले आहे. आपल्या सारखा विद्वान आणि गांधीवादी अहिंसाप्रिय व्यक्ती, संभाजी बी-ग्रेडने ब्राम्हणांच्या हत्या सुरु केल्यावर त्यांच्या तलवारींना धार लावून देणार, की तलवार चालवणार की, संभाजी बी-ग्रेडचे गोबेल्स होऊन ह्या हत्या कश्या योग्य होत्या त्याचे दाखले देणार?  "

कोहम महोक आणि खेडेकर साहेबांच्या इतर विरोधकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की खेडेकर साहेबांचे मुल्यमापन 'केवळ शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावरून करणे पूर्णपणे चुकीचे आहे. विरोधकांना खेडेकर साहेबांनी इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत हे माहीत आहे का? शिवाय पुस्तकांपेक्षा त्यांनी प्रत्यक्षात केलेले काम, संघटना बांधणी, समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरीती यांना फाटा देण्यासाठी केले प्रबोधन, त्या प्रबोधनामुळे समाजात  मोठ्या प्रमाणावर झालेली जागृती,  नव्या विचारांची समाजाने केलेली  अंमलबजावणी अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत.

शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेबांनी ब्राम्हण समाज व ब्राम्हण स्त्री-पुरुष यांच्याविषयी जे कांही लिहिलेले आहे तो वादाचा विषय आहे. कोहम महोक यांनी  या लिखाणास विकृत लेखन म्हंटले आहे. इथे प्रश्न असा आहे की अशाच प्रकारचे लेखन वैदिक परंपरेतील धार्मिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मग तो ऋग्वेद असू दे, मनुस्मृती असू दे की पुराणे असू द्यात. परशुराम ही व्यक्ति क्षत्रियांची सरसकट कत्तल करते, आणि त्याचे चेले आजही या गोष्टीचे समर्थन करतात. महात्मा गांधी यांची हत्या करतात आणि त्या हत्येचे समर्थन करतात. मुस्लिमांना (आणि त्यानंतर ख्रिस्त्यांना) संपवण्याची भाषा करतात, त्यासाठी दंगली घडवून आणतात, दहशतवाद करतात, त्याचे काय करायचे? खेडेकर साहेबांनी नुसते लिहिले आहे, परशुरामीय समाज तर अशा गोष्टी प्रत्यक्षात करत असतो. त्यामुळे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेब यांनी मांडलेल्या मतांना विरोध करायचा नैतिक अधिकार परशुरामीय समाजास अजिबात नाही आहे.

लेखकाने आपल्या ब्लॉगवर पुढे म्हंटले आहे, "आपण खेडेकरांना युगपुरुष म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील युगपुरुषांची यादी बघुयात, मी ब्राम्हण युगपुरुष (आपल्या ब्राम्हणप्रेमामुळे) यादीत समाविष्ट पण करत नाहीये - ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले ह्या यादीत आपण सरळ चेहऱ्याने आम्हाला सांगता आहात की, पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या इसमाचा समावेश करावा......."  आता या यादीत लेखकाने जी नावे दिली आहेत त्यांना परशुरामीय लोक त्या-त्या काळात कुठे महापुरुष मानत होते, आणि आता तरी कोठे मानतात? ज्योतिबा फुले यांच्यावर मारेकरी पाठवणारे, सावित्रीबाई फुले यांना दगडे मानणारे, शाहू महाराजांचा अपमान करणारे, बाबासाहेब आंबेडकरांना मंदिर प्रवेश नाकारणारे नेमके कोण होते? अगदी अलीकडे महात्मा फुले यांना 'फुले नव्हे, ही तर दुर्गंधी' म्हणणारे कोण होते? 

त्यामुळे कोहम महोक यांनी या यादीत खेडेकर साहेबांचा समावेश करायचा की नाही याचा सल्ला देवू नये, तो त्यांचा अधिकार नाही. मीही खेडेकर साहेबांची तुलना या महापुरुषांशी केलेली नाही आहे. किंबहुना कोणत्याच महापुरुषाची तुलना दुस-या महापुरुषाशी करणे चुकीचे असते. प्रत्येक महापुरुषाचे कार्य Unique, वेगळ्या प्रकारचे असते, त्यांच्या-त्यांच्या काळानुरूप असते. खेडेकर साहेब जे कार्य करत आहेत तेही Unique आहे, तसे कार्य आजवर दुस-या कोणी केलेले नाही आहे. जर पळपुटे माफीवीर तुमच्यासाठी स्वातंत्र्यवीर ठरतात, तर ज्यांनी मराठा आणि इतर बहुजन समाजाला योग्य दिशा दिली आहे, त्यांच्या विचारसरणीत क्रांती केली आहे. , ते आमच्यासाठी युगपुरूषच आहेत.

देव नाकारण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाही जमले नाही, ते खेडेकर साहेबांनी सुरू केलेल्या चळवळीने साध्य करून दाखवले आहे. बहुजन समाजावरील ब्राम्हणी वर्चस्वाला, कर्मकांडांना, पुरोहितशाहीला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे,  बहुजन समाजात शेकडो पुरोगामी वक्ते, लेखक तयार करण्याचे, अनेक प्रकाशन संस्था व नियतकालिके सुरू करण्यासाठी प्रेरणा देण्याचे, समाजाला विज्ञानाभिमुख बनवण्याचे काम खेडेकर साहेबांनी करून दाखवले आहे.  याशिवाय बहुजन समाजाचा मूळ धर्म पुनर्जीवित करणे, वैदिकांनी निर्माण केलेली हिंदू आणि मुस्लिम समाजातील दरी भरून काढणे, समाजात आणि कुटुंबात स्त्रियांना पुरुषांपेक्षा महत्वाचे स्थान मिळण्यासाठी मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करणे अशी अनेक क्रांतीकारक कामे खेडेकर साहेबांनी करून दाखवली आहेत.

संभाजी ब्रिगेड  
अनेक परशुरामीय लोक, जे स्वत: तथाकथित हिंदू दहशतवादाचे (प्रत्यक्षात वैदिक दहशतवादाचे ) समर्थन करतात,  संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना मानतात.संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असली तरी या संघटनेने दंगली पेटवल्याचे किंवा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे आर.एस.एस., सनातन संघटना यांचे समर्थन करणा-यांनी संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना संबोधणे चुकीचे आहे. संभाजी ब्रिगेडचा आक्रमकपणा परशुरामियांचा सामाजिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी आहे. पण संभाजी ब्रिगेड तेवढे एकच काम करत नाही. ही संघटना  शिक्षण, समाज सुधारणा, उद्योजकता विकास अशा अनेक क्षेत्रात भरीव काम करत आहे.

जैन धर्म, गांधीवाद आणि अहिंसा 
कोहम महोक यांनी आपल्या लेखात मला गांधीवादी म्हंटले आहे. माझ्यावर गांधीवादाचा थोडा प्रभाव असला तरी मी गांधीवादी नाही आहे. मी अनेकांतवादी आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, तसेच कोणताही धर्म, समाज, व्यक्ती १००% चांगली किंवा १००% वाईट असते असे मी कधीच मानत नाही. कांही लोक नाण्याची एकच बाजू बघतात, अनेक विचारी लोक नाण्याची दुसरी बाजूही बघतात. मी त्याच्याही पुढे जावून नाण्याची तिसरी बाजू म्हणजे कड, तिचाही विचार करतो.  त्यामुळे जैन धर्म आणि गांधी यांच्या अहिंसेचे हिंसक लोकांकडून होणा-या  एकांगी चित्रणाचा मी निषेध करतो.

अहिंसक गांधीजी हे हिंसक सावरकरांसारखे भेकड नव्हते. गांधीजींच्या चळवळींमध्ये कुठेही पळपुटेपणा दिसत नाही. याउलट सतत हिंसक गप्पा मारणारे परशुरामीय लोक किती पळपुटे असतात ही मी अनेकदा पाहिले आहे. भेकड वृत्तीमुळे ते सतत दुस-यांना भडकावून हिंसा करायला प्रवृत्त करतात, आणि स्वत: मात्र कातडीबचावू बनून हिंसेचा विकृत आनंद लुटत असतात. भेकडांना हिंसेचे टोकाचे आकर्षण असते, आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे परशुरामीय विचारसरणीचे लोक. परशुरामीय विचारसरणीच्या लोकांच्या भेकडपणाचे एक उदाहरण खेडेकर साहेबांच्या शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकाच्या संदर्भातीलच आहे. परशुरामियांना या पुस्तकाचा राग तर आला, पण त्यांच्यातील एकाही माणसाला या पुस्तकावर केस करण्याची हिम्मत झाली नाही. यावरूनच कळते की स्वत:ला परशुरामाचे अनुयायी समजणारे क्षत्रियांपुढे कशी नांगी टाकतात.

जैन धर्मात अहिंसेला महत्व असले तरी ती एकांगी अहिंसा नव्हे. मुळात 'अहिंसा परमो धर्म' हे वाक्य कोणत्याही जैन ग्रंथातले नसून महाभारतातील शांतीपर्वातील आहे.  जैन धर्म प्रतिकारासाठी हिंसेला परवानगी देतो. गरज म्हणून जैनांनीही अनेकदा हिंसा केली आहे. अगदी परशुरामाची देखील. ते उठसुठ आणि विनाकारण हिंसक बनत नाहीत एवढेच.  आता हे जैन म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून भारतातले वर्णव्यवस्थेबाहेरील अवैदिक क्षत्रिय आहेत. पण हा या लेखाचा विषय नव्हे, म्हणून त्याविषयी इथे अधिक लिहित नाही.

शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवादाच्या विरोधात आहे. वैदिक ब्राम्हणांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मला अजिबात मान्य नाही. पण स्वत:ला अतिबुद्धिमान समजणा-या ब्राम्हणवादी लोकांना  ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यातील फरक कळत नाही याचे मला आश्चर्य वाटते.

संभाजी ब्रिगेड आणि मी

http://mahavichar.blogspot.in/2013/01/blog-post_19.html


संभाजी ब्रिगेड आणि मी

-महावीर सांगलीकर

संभाजी ब्रिगेडशी माझा संबंध २००४ या वर्षाच्या आसपास आला. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने जिजाऊ आणि छ. शिवाजी  महाराजांबद्दल आपल्या पुस्तकात जो बदनामीकारक मजकूर लिहिला, तो उघडकीला आल्यावर पुण्यात ज्या निषेध सभा व्हायला लागल्या त्या काळात संभाजी ब्रिगेडच्या अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची शाखा, त्यामुळे सेवा संघाच्या नेत्यांचीही ओळख झाली.

याच काळात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष खेडेकर साहेबांच्या एका भाषणात अस उल्लेख आला की चक्रवर्ती सुभौमाने परशुरामाला युद्धात मारून टाकले होते आणि त्याचा उल्लेख जैन साहित्यात आहे. पण तो उल्लेख नेमका कोठे आहे याची कोणालाच माहिती नव्हती. खूप प्रयत्न करून मी ती माहिती शोधून काढली. त्यावर एक लेख लिहिला आणि खेडेकर साहेबांना दाखवला. त्यांनी तो लेख मराठा मार्ग या मासिकाकडे पाठवण्यास सांगितला. पुढे तो लेख त्या मासिकात छापुनही आला. कांही दिवसांनी या विषयावर मी 'परशुरामाचा वध' हे संशोधनात्मक छोटे पुस्तकही लिहिले. (हे पुस्तक माझे मित्र नरेश जाधव यांनी प्रकाशित केले). या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. हे पुस्तक मी डॉ. आ.ह. साळुंखे यांना अर्पण केले होते.  पुढे डॉ. आ.ह. साळुंखे यांनी 'परशुराम: जोडण्याचे प्रतीक की  तोडण्याचे'  या आपल्या पुस्तकात परशुरामाच्या जैन साहित्यातील कथेवर विस्ताराने लिहिले.

पुढे बराच काळ मी संभाजी ब्रिगेडमध्ये गुंतत गेलो. दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा काढून टाकण्याच्या चळवळीत भाग घेतला.  मी ब्राम्हण विरोधी कधीच नव्हतो, पण ब्राम्हणांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात नेहमीच राहिलो आहे. त्या काळात माझा हा विरोध उफाळून आला. अनेक नवीन तरुणांना संभाजी ब्रिगेडशी  जोडले. एका कट्टर शिवसैनिक स्थानिक नेत्याला ब्रिगेडशी जोडण्यात मला यश आले. त्यानेही दादोजी कोंडदेव पुतळा हटवण्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली. अखेर एके रात्री पुतळा हटवण्यात आला, पण त्याची चाहूल मला आधीच लागली होती. ती रात्र चक्क जागून काढली. अपेक्षेप्रमाणे पुतळा हटवला गेला आणि कांही मिनिटातच मला तसा फोन एका कार्यकर्त्याकडून आला.

चिंचवड येथे एका व्याख्यान मालेचे ब्राम्हणी नाव बदलण्यासाठी मी यशस्वी प्रबोधन केले. पुढे त्या व्याख्यान मालेत शिवश्री प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान ठेवण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. दुस-या दिवशीच्या एका व्याख्यानात एका ब्राम्हणवाद्याने स्टेजवर येवून कालच्या व्याख्यानावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला. कालच्या भाषणात सोळुंके यांनी 'शिवधर्मात भटांना प्रवेश नाही' असे उदगार काढले होते. त्यावर या ब्राम्हणवाद्याने 'म्हणजे तुम्ही डोक्याला प्रवेश देणार नाही' असे उदगार काढले. व्याख्यान मालेच्या आयोजकाचे या विषयावर आधीच प्रबोधन झालेले असल्याने त्याने त्या ब्राम्हणवाद्याच्या  हातातील माइक काढून घेतला, स्टेजवरून खाली जाण्याचा हुकूम दिला आणि तब्बल अर्धा तास ब्राम्हणवाद्यांच्या स्वत:ला समाजाचे डोके समजण्याच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले. खाली आलेला त्या ब्राम्हनवाद्याचे मीही थोडे बौद्धिक घेतले.

पुढे संभाजी ब्रिगेडमुळेच बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांशी संबंध आला. त्यांचे अतिरेकी विचार मला कधीच पटले नाहीत. संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांच्या नादी लागून वहावत चालली आहे हे स्पष्ट दिसून आले. कदाचित संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांचा वापर करून घेत असावी अशी शंका आली. कांही बाबतीत ही संघटना बोटचेपी भूमिका घेते हे स्पष्ट पणे दिसून आले. उदाहरण म्हणजे डॉ.  विनोद अनाव्रत या लेखकाने लिहिलेले 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' हे पुस्तक. हे पुस्तक जेम्स लेनलाही लाजवेल असे आहे. पण संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर मौन बाळगले. (या पुस्तकाचे परीक्षण पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव  येथे वाचा) तसेच कांही नवबौद्ध वक्ते आणि लेखक 'जिजाऊ महार होती' अशी थेअरी मांडतात, त्यालाही ब्रिगेडचे वक्ते-नेते आक्षेप घेत नाहीत, उलट माना डोलावतात, ही गोष्ट मला अनाकलनीय वाटली.

संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी तरुणांमध्ये हिंदू धर्माबद्दल द्वेष आणि बौद्ध धर्माबद्दल अतिप्रेम तयार केले आहे. मला या दोन्ही गोष्टी चुकीच्या वाटतात. हिंदू धर्मातील वैदिक पंथ काढून टाकला की जो उरतो तो शैव धर्म आहे. तो मराठ्यांचा खरा धर्म आहे. तसेच मध्ययुगीन काळापर्यंत मराठ्यांमध्ये जैन धर्म मोठ्या प्रमाणावर होता याचे अनेक पुरावे देता येतील.  पण पूर्वी मराठे बौद्ध होते अशा बामसेफी प्रचाराला ब्रिगेडचे लेखक, वक्ते आणि अनुयायी बळी पडत आहेत. खरे म्हणजे  मराठे पूर्वी बौद्ध होते याला कसलाही पुरावा नाही.  (कृपया वाचा:वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे? ). बामसेफला खूष करण्यासाठी शिवाला नाकारणे, गांधीजींवर टीका करणे ही फारच विचित्र गोष्ट आहे.

ओ.बी.सींच्या तथाकथित बौद्ध धर्मांतराला मराठा सेवा संघाने पाठींबा दिला आहे. त्यांच्या या धोरणाचीही मला गम्मत वाटते.  बौद्ध धर्माचे गुणगान गायचे, पण स्वत: बौद्ध धर्म स्वीकारण्याऐवजी वेगळा शिवधर्म काढायचा, ओ.बी.सी. जाती बौद्ध धर्म स्वीकारत असतील तर त्याचे स्वागत करायचे पण त्यांना  शिवधर्माची दारे बंद ठेवायची ही गोष्ट खटकते. आमचे अंतिम ध्येय बौद्ध धर्म हेच आहे, शिवधर्म हा एक थांबा आहे असे स्पष्टीकरण दिले जाते, पण मग ओ.बी.सी. जाती थांबा न घेता  बौद्ध होणार आहेत म्हणे, तीच गोष्ट मराठा सेवा संघ का करू शकत नाही? असा प्रश्न तयार होतो. असो.

वाघ्या कुत्र्याच्या बाबतीतील संभाजी ब्रिगेडची भूमिकाही मला चुकीची वाटते. अशा प्रकारांमुळे आपण बहुजनांतीलच घटकांना आपले शत्रू बनवतो याचे भान यायला पाहिजे.

एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे. त्यांच्या विरोधकांना हे पटणार नाही, पण जे त्यांना जवळून ओळखतात, त्यांचे विचार जाणतात त्यांना ही गोष्ट पटते. खेडेकर साहेबांनी मराठा समाजातील अनेक अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती बंद होण्यासाठी अनेक यशस्वी प्रयत्न केले आहेत. तसेच मराठा आणि मुस्लिम समाजातील दरी कमी करण्यासाठी योग्य पाउले उचलली आहेत, त्यामुळे मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहात आले आहेत. खेडेकर साहेबांनी  जे बीज रोवले आहे, त्याची चांगली फळे पुढील कांही दशकातच दिसू लागतील. पण खेडेकर साहेबांच्याकडे जी दूर दृष्टी आहे, ती दुस-या फळीतील नेत्यांकडे नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

बाकी कांहीही असले तरी संभाजी ब्रिगेड ही संघटना  महाराष्ट्राची एक गरज आहे.  माझ्या या मतावर मी ठाम आहे. कारण ब्राम्हणवादी संघटनांना, ब्राम्हणी वर्चस्ववादाला फक्त हीच संघटना आळा घालू शकते. या संघटनेने ते अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. येथे हे लक्षात घ्यावे की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवाद्यांच्या संदर्भात बोलत आहे.  असो.

संभाजी ब्रिगेडने अधिक व्यापक भूमिका घेवून या संघटनेचा 'मराठा युवकांची संघटना' हा चेहरा बदलला पाहिजे, आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन तरुणांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे.

गुरुवार, ३ मे, २०१२

“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥
या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत नामदेव यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने ह्या ब्लॉगने आज एक लाख वाचकांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतात असलेल्या विषमतावादी वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात मराठा-बहुजनांच्या अनेक महापुरुषांनी कार्य केले. जैन धर्माच्या स्थापनेपासून ते शिवधर्माच्या प्रकटनापर्यंत अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. त्या संघर्षात सत्यशोधक नेहमीच आपले योगदान देत राहील. बर्‍याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जात प्रबोधनाचे काम सलग तिसर्‍या वर्षीही सुरु ठेवल्याचा आनंद मनात आहे. जगातील १० देशांमधून हा ब्लॉग वाचला गेला. ६३% वाचक हे सर्च इंजिनच्या माध्यमातून ब्लॉगपर्यंत पोचले. फेसबुकच्या माध्यमातून तर आमच्या हातात एक नवे माध्यमच लागले आहे. ब्राम्हणी प्रचार-प्रसार माध्यमे इथे चालणार्‍या बहुजन चळवळीचे काम हायलाईट करत नाहीत. फेसबुकच्या माध्यमातून हा ब्लॉग आणखी जास्त वाचकांपर्यंत पोचवता आला.
ब्लॉग चालवताना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचा अधिक कटू अनुभव आला. वेळ आली कि एकजात सगळे चांगले-वाईट ब्राम्हण कसे एकत्र येतात याचा अनुभव आला. ते त्याच्या चुका मान्य करत नाहीतच पण चुका सांगणार्‍यालाच गुन्हेगार घोषित करून मोकळे होतात. सुरुवातीला ब्लॉग लोकांपर्यंत पोचण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व हि साईट एकमेव माध्यम म्हणून वापरली. पण तेथील सगळ्या ब्राम्हणांनी (लोकशाहीच्या गप्पा करणार्‍या!) माझा ब्लॉग बॅन करायला साईट मालकाला भाग पाडले. जेम्स लेन प्रकरणी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला सांगणार्‍या पंडित अटल बिहारीचे समर्थक भाऊबंद असे वागताना पाहून मजा वाटली व चीडही आली. त्यामुळे मला सर्च इंजिन ओप्टीमायजेशन शिकता आले आणि माझी वाचकसंख्या टिकून राहिली. ब्लॉगची गुगल पेजरँक ३ आहे. गुगल, वर्डप्रेस, व इतर सर्व ओपन सोर्स (बौद्धिक नियंत्रण मुक्त) साईट्सची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच व्यक्तीस्वातंत्र्य आम्हाला इंटरनेटवर उपभोगण्यास मिळते.
युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी शेती आणि क्रिकेट याच्या पलीकडच्या जगात आम्हाला डोकावायला शिकवले. आणि कधी नव्हे ती मराठयांची पोरे विचार करायला लागली. फुकट दिलेले पुस्तक न वाचणारे पुस्तक विकत घेऊन वाचायला लागले, लिहायला लागले. आणि महाराष्ट्रात नव्हे देशात होणार्‍या दंगली बंद झाल्या. आरक्षण म्हणजे कुबड्या समजणारा समाज आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समजून घेण्याइतपत प्रगल्भ झाला. गेल्या हजारो वर्षात हार न पाहिलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला दादू कोंडदेवच्या माध्यमातून थेट हादरा दिला.
हा ब्लॉग चालवताना अनेक मित्रांनी व चळवळीतील सहकार्‍यांनी मदत केली. माझा बंधुमित्र निखील देशमुख (औरंगाबाद) याने ब्लॉग satyashodhak.com करायला व स्वतंत्र सेल्फ होस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी मदत केली. प्रकाश पोळ (कराड) यांनी चर्चा करून लेख आणखी चांगले होण्यास मदत केली. डॉ. बालाजी जाधव (औरंगाबाद), नितीन सावंत (परभणी), विकासराव चव्हाण (मुंबई), विशाल भोसले (लातूर), भैय्या पाटील (पुणे), अभय पाटील (बुलडाणा), अमरजित पाटील (पंढरपूर), अनिल माने (बारामती), पुरुषोत्तम जाधव (बीड), प्रदीप इंगोले (हिंगोली), संजीव भोर (अहमदनगर), संतोष गायधनी (नाशिक), सतीश काळे (पिंपरी-चिंचवड), प्रकाश पिंपळे (मुंबई), सुनील चौधरी (जळगाव) व अशा अनेक चळवळीतील हितचिंतक व सहकार्‍यांनी चर्चा करून ब्लॉग अधिक चांगला होण्यास मदत केली. इतःपर त्यांचे आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.
शेवटी या देशात फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत समाजरचना निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन देतो. व हा छोटासा लेख पूर्ण करतो.
जय जिजाऊ!
-विनीत
*(सत्यशोधक.कॉम   वरून साभार )*

सोमवार, ३० एप्रिल, २०१२

पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा

*अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरून साभार* -
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.

पुणे जिल्ह्याला मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यायला हवे. मालोजी राजे भोसले यांनी पुण्याची पायाभरणी केली. मालोजी महाराजांचे पणतु छत्रपती संभाजी महाराजांनी पुण्याच्या भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक केला. मराठ्यांच्या लढावू इतिहासाला सर्वोच्च स्थानी नेले. भोसल्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर'  असे ठेवण्यात यावे. येत्या १४ मे रोजी संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल, तर  पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी त्यासाठी आंदोलन करावे, असे मी या निमित्ताने सुचवू इच्छिते.


पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करणे कसे संयुक्तिक आहे, हे पाहण्यासाठी पुण्याचा धावता इतिहास पाहणे आवश्यक आहे. पुण्याला इ.स.च्या ९ व्या शतकापर्यंतचा जुना इतिहास आहे. इ.स. नवव्या शतकाच्या मध्य काळातील काही ताम्रपटांत पुन्नक या नावाचे उल्लेख असलेली छोटी वसाहत म्हणजे आजचे पुणे होय, असे इतिहासकार मानतात. ९ व्या शतकाच्या अखेरीस पुणे देवगिरीच्या यादवांनी ताब्यात घेतले. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम राज्यकत्र्यांचा अंमल सुरू झाला. या काळात पुणे वेगवेगळ्या मुस्लिम राजवटींच्या ताब्यात राहिले. या संपूर्ण काळात पुण्याचा इतिहास फार देदिप्यमान असा नव्हता. पुण्याला ऐतिहासिक झळाळी मिळवून देण्याचे काम केले ते वेरुळच्या भोसल्यांनी. आज पुण्याचे जे काही स्थान, ते केवळ आणि केवळ भोसल्यांमुळे. १५९५ मध्ये पुणे आणि सुपे ही गावे मालोजी राजे भोसल्यांना जहागिर म्हणून मिळाली. मालोजी राजांच्या ताब्यात येताच पुण्याचा उत्कर्ष सुरू झाला. हीच जहागिर वंश पुढे शहाजी राजांकडे आली. शहाजी राजांनी पुण्याचा संपूर्ण कायापालटच केला, हे सर्वज्ञात आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजी राजे 

पुण्याचा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंधांबाबत येथे लिहिण्याची गरज नाही. कारण हा इतिहास जवळपास सर्वांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो. पुण्याच्या लाल महालात शिवाजी राजांचे बालपण गेले. तसेच स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले पुणे जिल्ह्यातच आहेत. मराठा साम्राज्याचे द्वितीय चक्रवर्ती सम्राट आणि शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि पुण्याचा संबंध लोकांना फारसा माहीत नाही. संभाजी राजांचा जन्मही पुणे जिल्ह्यातच झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस होता १४ मे १६५७. पुरंदर हा पुणे जिल्ह्यातला एक तालुकाही आहे. शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांचे बहुतांश बालपणही पुणे परिसरातच गेले. महाराज २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचे अकाली निधन झाले. जिजाऊ माँसाहेबांनी राजांचे संगोपन केले. शिवरायांप्रमाणेच त्यांच्या छाव्यालाही जिजाऊ माँसाहेबांकडून राजकारणाचे सर्व शिक्षण मिळाल्यामुळे संभाजी महाराज प्रतिशिवाजी म्हणून कर्तृत्व गाजवू शकले. संभाजी महाराज १७ वर्षांचे असताना शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज युवराज बनले.

थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी दिल्लीचा सम्राट औरंगजेब ५ लक्ष फौज घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याच्या फौजेत ४ लाखांपेक्षाही जास्त हत्ती, घोडे आणि इतर जनावरे होती. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या छोट्याशा सैन्यानिशी औरंगजेबाशी सात वर्षे कडवी झुंज दिली.  औरंगजेब महाराष्ट्रभर किल्ले जिंकित  फिरला, परंतु त्याला ते कायम स्वरूपी कधीच ताब्यात ठेवता आले नाही. शेवटी औरंगजेबाने फंदफितुरीचा मार्ग अवलंबून १ फेब्रुवारी १६८९ रोजी कोकणातील संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना कैद केले. नियतीची योजना फार कठोर असते. ज्या पुणे परिसरात महाराजांचा जन्म झाला त्याच परीसरात नियतीने त्यांचा मृत्यू लिहिला होता. तसे नसते तर कोकणात पकडले असताना महाराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने त्यांना घाटावर आणले नसते. संभाजी महाराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबाला मराठा सैन्याकडून असलेला धोका वाढला होता. हे जाणून औरंगजेब लगोलग घाट चढून तुळापूरला आला. तुळापूर हे गाव पुण्यापासून अवघ्या ४० किमींवर आहे. पुणे जिल्ह्यातच हे गाव येते. तुळापुरात महाराजांना ठार मारण्यात आले. आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून परीसरात दूरवर फेकून देण्यात आले. जवळच असलेल्या वढू बुद्रूक गावातील शूर मावळ्यांनी महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तुळापुरात महाजांना ज्या ठिकाणी मारण्यात आले, त्या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे. तसेच वढू बुद्रुक गावात महाजांची समाधी आहे. ही दोन्ही स्थळे संभाजी महाराजांच्या शौर्याच्या जिवंत खुणा आहेत.
तुळापुरातील ज्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात
आले त्या जागेवर बांधण्यात आलेली स्मृती कमान.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला ब्राह्मण इतिहासकारांनी दाबून ठेवले होते. महाराजांना बदफैली ठरविण्यात आले होते. तुळापूर, वढू बुद्रुक ही खरे तर महाराष्ट्रासाठी तीर्थस्थळे व्हायला हवी होती. कारण येथे मराठ्यांचा राजा धारातीर्थी पडला होता. मात्र, ब्राह्मणी कारस्थानाचा महिमा असा की, ही स्थळे दुर्लक्षित राहिली. अलीकडे   पुरोगामी विचारांच्या  संघटनांनी ती नव्याने प्रकाशात आणली. संभाजी राजांना पकडून देण्यामागे तसेच त्यांना हाल हाल करून मारण्यामागे ब्राह्मणांचा ब्रेन होता, हे आता इतिहासकारांनी शोधून काढले आहे. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, मराठ्यांनी त्या काळीच आपला योग्य तो इतिहास का लिहिला नाही. तेव्हा मराठयांनी  इतिहास लिहून ठेवला असता, तर आता जुनी कागदपत्रे धुंडाळणयचे काम पडले नसते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, छत्रपती संभाजी महाजाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्य नुसते लढतच राहिले. इतर कामे करण्यास त्यांना कुठे वेळ होता. पुढची संपूर्ण २१ वर्षे मराठे लढत होते. मराठ्यांनी आपले साम्राज्य औरंगजेबाच्या हाती जाऊ दिले नाही. हतबल औरंगजेबाला महाराष्ट्रातच देह ठेवावा लागला. या संपूर्ण काळात मराठ्यांना इतिहास लिहायला किंवा आपली पूज्यस्थाने जपायला वेळ नव्हता. इतिहास लिहिण्याची जबाबदारी समाजातील विद्वान वर्गाची असते. महाराष्ट्रात ही जबाबदारी ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मणांनी आपली जबाबदारी नीट पार तर पाडली नाहीच, उलट छत्रपती संभाजी राजांचा चुकीचा इतिहास प्रसृत केला. मराठे लढत होते, तेव्हा ब्राह्मण खोट्या बखरी लिहिण्यात गुंतले होते. ब्राह्मणांनी महाराष्ट्रद्रोह केला. अजूनही तो सुरूच आहे.

उपसंहार

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला. त्यांचे बालपण पुणे जिल्ह्यात गेले. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांनी राजकारणाचे बाळकडू याच जिल्ह्यात दिले. याच जिल्ह्याच्या मातीने त्यांचा मृत्यू पाहिला. महाराजांचा देह याच मातीत विलीन झाला. पुणे जिल्ह्याची माती संभाजी महाराजांनी पुण्याच्या मातीला आपल्या रक्ताने पावन केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव देणे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. हीच लोकभावना आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने लोकभावनेचा आदर करून पुणे जिल्ह्याच्या नामांतराचा ठराव लवकरात लवकर आणावा. महाराजांचे नाव दिल्याने पुणे जिल्हा खèया अर्थाने पुण्यवंत
होणार आहे. हे पुण्यकर्म सरकारने करावेच. महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या नावाने कोणतेही शहर नाही. ही उणीव भरून काढली जायला हवी.
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.