सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?

हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही

भारतातील सगळेच समाज, मग ते धार्मिक समूह असोत की जातीय, अल्पजन आहेत. सगळे अल्पजन एकत्र आले म्हणून कांही त्यांना बहुजन म्हणता येणार नाही. तरीही विषयाच्या सोयीसाठी मी या लेखात त्यांना बहुजन असे संबोधत आहे.
या तथाकथित बहुजनांनी ब्राम्हण समाजाच्या विरोधात लढा पुकारला आहे. ब्राम्हण हे कितीही आपमतलबी, अहंकारी आणि स्वत:ला श्रेष्ठ समजणारे असले, त्यांनी धर्म आणि इतिहास या क्षेत्रात कितीही लांड्या-लबाड्या केल्या असल्या तरी ते कातडी बचाऊ आणि घाबरट आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट करणे सोपे, सोयीचे आणि सुरक्षित आहे. केवळ त्यामुळेच ब्राम्हणांना फासिस्ट पद्दतीने टार्गेट करण्यात येत आहे.
ब्राम्हणांनी जर बहुजनांना गेली पाच हजार वर्षे गुलामीत ठेवले असेल, तर यात दोष ब्राम्हणांचा की या बहुजनांचा? ब्राम्हणांनी आपला स्वार्थ पाहिला यात विषेश ते काय, पण जर बहुजन अल्प अशा ब्राम्हण समाजाचा चक्क पाच हजार वर्षे गुलाम रहात असेल तर ही गोष्ट या तथाकथित बहुजनांची योग्यता काय आहे हेच दाखवून देते. बहुजनवाद्यांच्या मते बहुजनांच्या अवनतीला ब्राम्हण हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. आपण हे खरे आहे असे मानले तर आपणाला हेही मानावे लागेल की ब्राम्हण हे श्रेष्ठ आहेत, कारण ’साडे तीन टक्के’ असणारा ब्राम्हण समाज एवढ्या मोठ्या बहुजन समाजाला वाकवू शकतो तेही हजारो वर्षे!
बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?
आता प्रश्न हा आहे की बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का? ज्यांना खरेच आत्मपरीक्षण करावे असे वाटते त्यांनी खालील गोष्टींवर जरूर विचार करावा:
१. भारतभर गावोगावी दलितांवर राजरोस जे अत्याचार होत असतात, ते करणारे लोक नेमके कोण असतात? या अत्याचारांमध्ये ब्राम्हणांचा सहभाग किती असतो? ’यात बहुजनांचा दोष नसून ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या सिस्टीमचा दोष आहे’ असे ज्यांना वाटते ते ही सिस्टीम मोडण्यासाठी काय करत आहेत? की ही सिस्टीम चालूच रहावी असेच त्यांना वाटते?
२. ब्राम्हण विरोधी पुस्तके लिहिणा-या बहुजन लेखकांची संख्या भरमसाठपणे वाढत आहे. पण बहुजन समाजात इतर महत्वाच्या विषयांवर लिहिणा-यांचे प्रमाण काय आहे? कला, साहित्य, माहिती, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, मनोरंजन, अर्थकारण, धर्म, तत्वज्ञान, समीक्षा असे हजारो विषय लिहिण्यासाठी आहे. बहुजन समाजात अशा विषयांवर लिहिणा-यांची वानवा आहे. असे का? या विषयांवर लिहिण्यासाठी अभ्य़ास आणि संशोधन करायला लागते, खूप मेहनत घ्यावी लागते, भरपूर वेळ खर्च करावा लागतो म्हणून? त्यापेक्षा ब्राम्हणविरोधी लिहायला फारसी मेहनत करणे गरजेचे नसते, केवळ शिव्या घातल्या तरी भागते.
बहुजन लेखकांची झेप फारतर ’पानीपत’पर्यंतच असते! पानीपत पलिकडे जायला ते तयारच नाहीत.
जी गोष्ट बहुजन लेखकांची, तीच गोष्ट बहुजन वाचकांची. त्यांचीही झेप तेवढीच. आणि बहुसंख्य बहुजन तर वाचतच नाहीत. चळवळीच्या बाहेरचे बहुजन राजकरण आणि क्रिकेट या दोनच विषयांवर वाचताना आणि बोलताना दिसतात.
३.बहुजनवादी लेखक आणि नेते ब्राम्हणी मेडियाला नेहमी दोष देत असतात. मेडीयामधले ब्राम्हण हे त्यांचे मोठे टार्गेट असते. मेडीयाचे मालक हे ब्राम्हणेतरच असतात, त्यातील कित्येक तर बहुजनच असतात. पण संपादकीय विभागातील महत्वांच्या पदावर ब्राम्हण असतात. यात दोष त्या ब्राम्हणांचा, त्यांना तेथे ठेवणा-या बहुजन मालकांचा की बहुजनांचा? बहुजन लोक सामान्य रिपोर्टर होवू शकतात, पण संपादक होण्याची योग्यता अजून त्यांच्यात आली नाही हे खरे नाही का? (कांही अपवाद असू शकतात, पण ते अपवादच आहेत). बहुजनातून कोणी माधव गडकरी, कुमार केतकर, निखिल वागळे का तयार होवू शकत नाहीत?
४. आंतर्जातीय लग्न केले म्हणून त्या मुलाला व मुलीला ठार मारणारे बहुजनच असतात. असा प्रकार कधी ब्राम्हणांनी केला आहे का? ब्राम्हण मुली दलितांशीही लग्ने करताना दिसतात, पण समान सामजिक दर्जा असणा-या दोन बहुजन जातीत देखील लग्न होणे म्हणजे आकाश कोसळणे होय. जातीव्यवस्था बळकट करण्यात बहुजन समाजच आघाडीवर आहे, हे खरे नाही का?
५. बहुजनांपैकी अनेक समूहांकडे प्रचंड सत्ता, संपत्ती आणि साधन सामग्री आहे. पण त्यांच्यापैकी कोणीही तळागाळातील लोकंसाठी शाळा, हॉस्पिटल्स, अनाथालये, समाजोपयोगी संस्था काढल्या नाहीत. हे काम भारतातील पारशी, ज्यू , ख्रिस्ती, जैन व कांही प्रमाणात ब्राम्हण समाजाने केले. बहुजन समाजाने अलिकडच्या काळात कॉलेजेस, सहकारी संस्था, हॉस्पिटल्स काढले, पण त्यामागे अर्थकारण व राजकारण हेच मुख्य उद्देश होते, समाजसेवा नव्हे.
ब्राम्हण समाजाने भारतात अनेक इतिहास संशोधन संस्था काढल्या, अनेक प्रकाशन संस्था काढल्या, बहुजनांना ते अजूनही जमत नाही. ब्राम्हणांनी चुकीचा व एकांगी इतिहास लिहिला हे खरे आहे, पण त्यांनी संशोधन संस्था काढल्या, बहुजनांनी काय केले? आज कांही बहुजन लोक आपल्या ’जातीय’ इतिहास संशोधन संस्था काढत आहेत, आणि ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला म्हणून हेही खोटा इतिहास लिहित आहेत. बरे, ब्राम्हणांनी जे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केले, ते हे बहुजन आता करत आहेत, म्हणजे बहुजन हे लेट-लतीफ आहेत हे कबूल करावे लागेल.
६. ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात बंदिस्त करून टाकले, बहुजनांनी तर वेगळे काय केले? शिवाजी महाराजांचा उपयोग राजकारणासाठी करण्यात बहुजन कुठे मागे आहेत? शिवाजी महाराजांचे राज्य कोकणापासून तमिळनाडूपर्यंत होते पण आजही बहुसंख्य बहुजन शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची इस्टेट समजतात. महाराजांना छोटे करण्यात ब्राम्हणांइतकेच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त बहुजन दोषी आहेत.
७. अलिकडे बहुजनांतील अनेक जाती स्वत:ला अभिमानाने शूद्र म्हणवून घेऊ लागल्या आहेत. जर स्वत:ला ब्राम्हण अथवा क्षत्रिय म्हणवून घेणे म्हणजे वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणे असे हे 'पुरोगामी शूद्र’ मानतात, तर मग स्वत:ला शूद्र म्हणवून घेणे हेही वर्णव्यवस्थेचे समर्थन नाही काय? तसेच ज्याप्रमाणे हिंदू ही अरबी-फारसी लोकांनी दिलेली शिवी आहे, त्या प्रमाणेच शूद्र ही तथाकथित उच्च वर्णियांनी दिलेली शिवी आहे. त्या शिवीचा अभिमान धरणे योग्य आहे का?
८. बहुजन समाजात व्यक्तिपूजा हा प्रकार अगदी किळस यावी इतका बोकळला आहे. प्रत्येक जातीचे बहुजन आपापल्या जातीतला एखादा महापुरुष शोधून त्याचा उदोउदो करण्यात धन्यता मानत आहे. त्या-त्या महापुरुषाचे विचार, कार्य यापेक्षा तो आमच्या जातीचा आहे यालाच महत्व आले आहे. या महापुरुषांच्या नावांचा दुरुपयोग आणखी किती काळ तुम्ही करणार आहात?
९ . तुमची संख्या किती आहे त्याला महत्व नाही तर तुमच्यात किती शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, संपादक, सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी, सेनाधिकारी, कलाकार, संशोधक, विचारवंत वगैरे आहेत हे महत्वाचे आहे. केवळ यावरूनच एखाद्या समाजाची योग्यता ठरत असते. या आघाडीवर पाहिले तर बहुजन समाज मागासलेलाच आहे. हे मागासलेपण कोणाला शिव्या देवून दूर होणार नाही.

बहुजन चळवळीच्या आघाडीवर मला जे दिसले ते मी येथे लिहिले आहे. बहुजनांचा आजवरचा इतिहास पाहिला तर यात लगेच कांही सुधारणा होईल असे मला वाटत नाही.
हेही वाचा:

बहुजनांनो आत्मपरीक्षण करा
बिनडोक बहुजनांचा ब्राम्हणवाद
...तर बहुजन ही लढाई कधीच जिंकू शकणार नाहीत!
बहुजनांचा वैचारीक गोंधळ
मराठ्यांचे आपल्या प्राचीन इतिहासाकडे दुर्लक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.