बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे युगपुरुषच

http://mahavichar.blogspot.in/2013/01/blog-post_21.html


शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे युगपुरुषच

-महावीर सांगलीकर 

मी नुकत्याच लिहिलेल्या संभाजी ब्रिगेड आणि मी या लेखाचे अनेकांनी प्रचंड स्वागत केले. पण त्याच वेळी हा लेख संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांचे विरोधक असणा-या लोकांना अजिबात आवडलेला नाही. विशेष करून मी खेडेकर साहेबांचा 'युगपुरुष' असा केलेला उल्लेख या विरोधकांना खटकला आहे.

कोहम महोक या टोपण नावाने लिहिणा-या लेखकाने माझ्या लेखाचा आणि संभाजी ब्रिगेड व खेडेकर साहेब यांच्याविषयी माझ्या मतांचा समाचार घेण्यासाठी आपल्या ब्लॉगवर एक ओपन लेटर लिहिले आहे. (शिवश्री महावीर सांगलीकरांना कोहमचे अनावृत्त पत्र (ओपन लेटर))   त्यातील मते ही संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांच्याविषयी राग असणा-यांची प्रातिनिधिक मते सौम्य भाषेत दिली गेली आहेत हे स्पष्ट दिसते. हे ओपन लेटर असल्यामुळे त्याचे ओपन उत्तर देणे मी आवश्यक समजतो.

पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे युगपुरुषच 
लेखकाचा मुख्य आक्षेप मी(ही) खेडेकर साहेबांना युगपुरुष समजतो या गोष्टीला आहे. लेखक म्हणतो, "मला सगळ्यात खटकला मुद्दा म्हणजे "एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे." - हा उल्लेख. एक ब्राम्हण म्हणून मी ह्या विधानाने का अस्वस्थ झालो असेन ते आपल्या लक्ष्यात आले असेल अशी अपेक्षा करतो. शिवरायांच्या बदनामीची केंद्रे ह्या पुस्तकातून खेडेकरांनी ब्राम्हण समाज, ब्राम्हण पुरुष आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्या विषयीचे विकृत लेखन ह्या आपल्या युगपुरुषोत्तमाने केले आहे. आपल्या सारखा विद्वान आणि गांधीवादी अहिंसाप्रिय व्यक्ती, संभाजी बी-ग्रेडने ब्राम्हणांच्या हत्या सुरु केल्यावर त्यांच्या तलवारींना धार लावून देणार, की तलवार चालवणार की, संभाजी बी-ग्रेडचे गोबेल्स होऊन ह्या हत्या कश्या योग्य होत्या त्याचे दाखले देणार?  "

कोहम महोक आणि खेडेकर साहेबांच्या इतर विरोधकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की खेडेकर साहेबांचे मुल्यमापन 'केवळ शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावरून करणे पूर्णपणे चुकीचे आहे. विरोधकांना खेडेकर साहेबांनी इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत हे माहीत आहे का? शिवाय पुस्तकांपेक्षा त्यांनी प्रत्यक्षात केलेले काम, संघटना बांधणी, समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरीती यांना फाटा देण्यासाठी केले प्रबोधन, त्या प्रबोधनामुळे समाजात  मोठ्या प्रमाणावर झालेली जागृती,  नव्या विचारांची समाजाने केलेली  अंमलबजावणी अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत.

शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेबांनी ब्राम्हण समाज व ब्राम्हण स्त्री-पुरुष यांच्याविषयी जे कांही लिहिलेले आहे तो वादाचा विषय आहे. कोहम महोक यांनी  या लिखाणास विकृत लेखन म्हंटले आहे. इथे प्रश्न असा आहे की अशाच प्रकारचे लेखन वैदिक परंपरेतील धार्मिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मग तो ऋग्वेद असू दे, मनुस्मृती असू दे की पुराणे असू द्यात. परशुराम ही व्यक्ति क्षत्रियांची सरसकट कत्तल करते, आणि त्याचे चेले आजही या गोष्टीचे समर्थन करतात. महात्मा गांधी यांची हत्या करतात आणि त्या हत्येचे समर्थन करतात. मुस्लिमांना (आणि त्यानंतर ख्रिस्त्यांना) संपवण्याची भाषा करतात, त्यासाठी दंगली घडवून आणतात, दहशतवाद करतात, त्याचे काय करायचे? खेडेकर साहेबांनी नुसते लिहिले आहे, परशुरामीय समाज तर अशा गोष्टी प्रत्यक्षात करत असतो. त्यामुळे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेब यांनी मांडलेल्या मतांना विरोध करायचा नैतिक अधिकार परशुरामीय समाजास अजिबात नाही आहे.

लेखकाने आपल्या ब्लॉगवर पुढे म्हंटले आहे, "आपण खेडेकरांना युगपुरुष म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील युगपुरुषांची यादी बघुयात, मी ब्राम्हण युगपुरुष (आपल्या ब्राम्हणप्रेमामुळे) यादीत समाविष्ट पण करत नाहीये - ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले ह्या यादीत आपण सरळ चेहऱ्याने आम्हाला सांगता आहात की, पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या इसमाचा समावेश करावा......."  आता या यादीत लेखकाने जी नावे दिली आहेत त्यांना परशुरामीय लोक त्या-त्या काळात कुठे महापुरुष मानत होते, आणि आता तरी कोठे मानतात? ज्योतिबा फुले यांच्यावर मारेकरी पाठवणारे, सावित्रीबाई फुले यांना दगडे मानणारे, शाहू महाराजांचा अपमान करणारे, बाबासाहेब आंबेडकरांना मंदिर प्रवेश नाकारणारे नेमके कोण होते? अगदी अलीकडे महात्मा फुले यांना 'फुले नव्हे, ही तर दुर्गंधी' म्हणणारे कोण होते? 

त्यामुळे कोहम महोक यांनी या यादीत खेडेकर साहेबांचा समावेश करायचा की नाही याचा सल्ला देवू नये, तो त्यांचा अधिकार नाही. मीही खेडेकर साहेबांची तुलना या महापुरुषांशी केलेली नाही आहे. किंबहुना कोणत्याच महापुरुषाची तुलना दुस-या महापुरुषाशी करणे चुकीचे असते. प्रत्येक महापुरुषाचे कार्य Unique, वेगळ्या प्रकारचे असते, त्यांच्या-त्यांच्या काळानुरूप असते. खेडेकर साहेब जे कार्य करत आहेत तेही Unique आहे, तसे कार्य आजवर दुस-या कोणी केलेले नाही आहे. जर पळपुटे माफीवीर तुमच्यासाठी स्वातंत्र्यवीर ठरतात, तर ज्यांनी मराठा आणि इतर बहुजन समाजाला योग्य दिशा दिली आहे, त्यांच्या विचारसरणीत क्रांती केली आहे. , ते आमच्यासाठी युगपुरूषच आहेत.

देव नाकारण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाही जमले नाही, ते खेडेकर साहेबांनी सुरू केलेल्या चळवळीने साध्य करून दाखवले आहे. बहुजन समाजावरील ब्राम्हणी वर्चस्वाला, कर्मकांडांना, पुरोहितशाहीला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे,  बहुजन समाजात शेकडो पुरोगामी वक्ते, लेखक तयार करण्याचे, अनेक प्रकाशन संस्था व नियतकालिके सुरू करण्यासाठी प्रेरणा देण्याचे, समाजाला विज्ञानाभिमुख बनवण्याचे काम खेडेकर साहेबांनी करून दाखवले आहे.  याशिवाय बहुजन समाजाचा मूळ धर्म पुनर्जीवित करणे, वैदिकांनी निर्माण केलेली हिंदू आणि मुस्लिम समाजातील दरी भरून काढणे, समाजात आणि कुटुंबात स्त्रियांना पुरुषांपेक्षा महत्वाचे स्थान मिळण्यासाठी मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करणे अशी अनेक क्रांतीकारक कामे खेडेकर साहेबांनी करून दाखवली आहेत.

संभाजी ब्रिगेड  
अनेक परशुरामीय लोक, जे स्वत: तथाकथित हिंदू दहशतवादाचे (प्रत्यक्षात वैदिक दहशतवादाचे ) समर्थन करतात,  संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना मानतात.संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असली तरी या संघटनेने दंगली पेटवल्याचे किंवा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे आर.एस.एस., सनातन संघटना यांचे समर्थन करणा-यांनी संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना संबोधणे चुकीचे आहे. संभाजी ब्रिगेडचा आक्रमकपणा परशुरामियांचा सामाजिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी आहे. पण संभाजी ब्रिगेड तेवढे एकच काम करत नाही. ही संघटना  शिक्षण, समाज सुधारणा, उद्योजकता विकास अशा अनेक क्षेत्रात भरीव काम करत आहे.

जैन धर्म, गांधीवाद आणि अहिंसा 
कोहम महोक यांनी आपल्या लेखात मला गांधीवादी म्हंटले आहे. माझ्यावर गांधीवादाचा थोडा प्रभाव असला तरी मी गांधीवादी नाही आहे. मी अनेकांतवादी आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, तसेच कोणताही धर्म, समाज, व्यक्ती १००% चांगली किंवा १००% वाईट असते असे मी कधीच मानत नाही. कांही लोक नाण्याची एकच बाजू बघतात, अनेक विचारी लोक नाण्याची दुसरी बाजूही बघतात. मी त्याच्याही पुढे जावून नाण्याची तिसरी बाजू म्हणजे कड, तिचाही विचार करतो.  त्यामुळे जैन धर्म आणि गांधी यांच्या अहिंसेचे हिंसक लोकांकडून होणा-या  एकांगी चित्रणाचा मी निषेध करतो.

अहिंसक गांधीजी हे हिंसक सावरकरांसारखे भेकड नव्हते. गांधीजींच्या चळवळींमध्ये कुठेही पळपुटेपणा दिसत नाही. याउलट सतत हिंसक गप्पा मारणारे परशुरामीय लोक किती पळपुटे असतात ही मी अनेकदा पाहिले आहे. भेकड वृत्तीमुळे ते सतत दुस-यांना भडकावून हिंसा करायला प्रवृत्त करतात, आणि स्वत: मात्र कातडीबचावू बनून हिंसेचा विकृत आनंद लुटत असतात. भेकडांना हिंसेचे टोकाचे आकर्षण असते, आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे परशुरामीय विचारसरणीचे लोक. परशुरामीय विचारसरणीच्या लोकांच्या भेकडपणाचे एक उदाहरण खेडेकर साहेबांच्या शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकाच्या संदर्भातीलच आहे. परशुरामियांना या पुस्तकाचा राग तर आला, पण त्यांच्यातील एकाही माणसाला या पुस्तकावर केस करण्याची हिम्मत झाली नाही. यावरूनच कळते की स्वत:ला परशुरामाचे अनुयायी समजणारे क्षत्रियांपुढे कशी नांगी टाकतात.

जैन धर्मात अहिंसेला महत्व असले तरी ती एकांगी अहिंसा नव्हे. मुळात 'अहिंसा परमो धर्म' हे वाक्य कोणत्याही जैन ग्रंथातले नसून महाभारतातील शांतीपर्वातील आहे.  जैन धर्म प्रतिकारासाठी हिंसेला परवानगी देतो. गरज म्हणून जैनांनीही अनेकदा हिंसा केली आहे. अगदी परशुरामाची देखील. ते उठसुठ आणि विनाकारण हिंसक बनत नाहीत एवढेच.  आता हे जैन म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून भारतातले वर्णव्यवस्थेबाहेरील अवैदिक क्षत्रिय आहेत. पण हा या लेखाचा विषय नव्हे, म्हणून त्याविषयी इथे अधिक लिहित नाही.

शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवादाच्या विरोधात आहे. वैदिक ब्राम्हणांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मला अजिबात मान्य नाही. पण स्वत:ला अतिबुद्धिमान समजणा-या ब्राम्हणवादी लोकांना  ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यातील फरक कळत नाही याचे मला आश्चर्य वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.