मंगळवार, १० जुलै, २०१२

तुका झालासे कळस!


संत तुकाराम महाराजांना तुका झालासे कळस म्हणून डोक्यावर घेणार्‍या महाराष्ट्राला तुकोबाच्या क्रांतीकारी कार्याचा परिचय अजून योग्यप्रकारे झाला नाही. असे खेदाने म्हणावे लागेल. विद्रोही तुकाराम लिहून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी एक टप्पा पार केला आहे.
तुकाराम महाराज वीस वर्षाचे असताना एक दिवस अचानक गायब झाले. बंधू कान्होबाने शोध घेतल्यावर त्यांना तुकाराम सात दिवसानंतर देहू जवळच्या बांबनाथ डोंगरावर सापडले. कान्होबा त्यांना घरी घेऊन येत असताना तुकारामांनी त्यांना इंद्रायणीच्या डोहाजवळ बसवले. कान्होबाला घरी जाऊन कर्जखाते आणायला सांगितले. कान्होबांनी कर्जखाते आणल्यानंतर त्यांनी त्याचे दोन भाग केले. एक भाग कान्होबाला दिला. आपल्या वाटेला आलेला भाग तुकारामांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविला. कर्जखते इंद्रायणीत बुडवली. वडिलोपार्जित महाजनकीतून स्वत:ला मुक्त केले. लोकांचे शोषण करुन त्यावर जगण्याचे शोषणाचे साधन त्यांनी बुडविले. तुकाराम वर्गविरहीत (DECLASS) झाले. मात्र कान्होबावर त्यांनी कशा प्रकारची जबरदस्ती केली नाही. क्रांती स्वत:पासून सुरु होते याचा बुद्धप्रणित आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला. आदर्शाच्या आतंकवादाला त्यांनी नकार दिला आणि कान्होबाचा निर्णय कान्होबावर सोपविला.
या घटनेचा अर्थ तुकारामांनी भांबनाथ पर्वतावर एकांतात घालविलेले दिवस देव, आत्मा, परमात्मा अशा पोकळ अध्यात्मिक विषयांवर चिंतनात न घालविता सामाजिक व आर्थिक शोषणाबाबत मूलभूत चिंतनात घालविले. त्यानंतर समाजात पुन्हा आले ते क्रांतीकारक म्हणूनच.
पुढील 20 वर्षामध्ये तुकारामांनी भल्याभल्यांना जेरीस आणले. वैदिक, पंडीत, श्रोतिय, याज्ञिक, योगी गुरु इत्यादी नानाविध रुपांनी व नावांनी वावरणार्‍या परंतु प्रत्यक्षात भोंदूगिरी करणार्‍या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम सातत्याने केले.
तुकाराम वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांनाही नकार देतात.

वर्णाभिमान विसरली याति।
एकएका लोटांगणी जाती।।
निर्मळ चित्ते जाली नवनीते।
पाषाण पाझर सुटती रे॥

तुकोबाच्या क्रांतीकारी चळवळीती माणसे वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेला नकार देऊन चित्त परिशुद्धिच्या बुद्धप्रणित मार्गावर चालताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्या चित्तातील मळ नष्ट झाला आहे अशा प्रकारे वर्ण व जातीव्यवस्था नाकारून तुकाराम जातीवर्ण विरहीत (DECAST) होतात.
क्रांतीला निघालेल्या माणसाला स्वत: वर्गविरहीत व जातीविरहीत व्हावेच लागते. स्वत:ला ब्राह्मण्यमूक्त करायला लागते. तुकाराम महाराज (DEBRAHAMANISED) म्हणजे ब्राह्मण्य मुक्त होतात. स्वत: ब्राह्मण्यातून बाहेर न पडता परिवर्तन करणे शक्य नसते.
तुकारामांनी पारंपारिक संसार केला नाही. हे खरे आहे. परंतु संसार सोडला ही नाही ध्येयनिष्ठेमुळे संसाराकडे अनेकांचे दुर्लक्ष होते हे खरे आहे. कर्जखते बुडबून शोषणांचे साधन नष्ट करणार्‍या तुकारामांनी स्वत:च्या जमिनीची कागदपत्रे मात्र बुडविली किंवा नष्ट केली नाहीत. पंधरा बिघ्याहून जास्त जमीन त्यांच्या नावावर होती. शेती करुन आपल्या पत्नी व मुलांचे पालनपोषण केले. बुद्धाच्या सम्यक आजिविका या तत्वाचे त्यांनी तंतोतन पालन केले.

आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाचे अंग आनंदाचे॥
काय सांगो झाले काहिचिया बाही॥
पुढे चाली नाही आवडीने॥

निर्वाणाच्या स्थितीचे वर्णन करताना तुकारामांना शब्द सुचत नाहीत. आता कशातच आवड, रस, गुंतुन राहीले नाही असे ते जाहीर करतात.
निर्वाणानंतर निर्वाणाच्या आनंदात न डुंबता बुद्धाप्रमाणेच तुकाराम माणसांच्या महासागरात परिवर्तनासाठी क्रांतीची मशाल घेऊन संघर्षासाठी उतरतात. अखंड आयुष्य बहुजन हिताय बहुजन सुखाय चे अभिअयान चालवितात.
वेदांचा अर्थ केवळ आपल्यालाच कळला आहे. बाकीचे केवळ शब्दांचा भारच वाहतात असे ते जाहिर करतात.
भलेतर देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी।
गरजवंताना, दलित, पिडीतांना शोषितांना ढुंगणाचेही काढून देऊ, त्यांच्यासाठी सर्वस्व बहाल करु. परंतु नाठाळ शोषकांना चांगलेच ठोकून काढू अशी रोखठोक भुमिका ते घेतात. तुकाराम हा ब्राह्मणी परंपरेने वर्ण केल्याप्रमाणे बावळट, नेभळट, अव्यवहारी असा नसून तो सामाजिक समतेसाठी शोषकांविरुद्ध शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध संघर्षास निघालेला कृतिशील क्रांतीकारक आहे.
दया तीचे नांव। पालन जीवांचे॥
आणि निर्दालन कंटकांचे।
या शब्दांत बुद्ध प्रणित अहिंसेचा, करुणेचा ते उदघोष करतात. सर्व जीवांचे पालन् करणे ही महाकारुणा ते मान्य करतात. मात्र कंटकाचे, शोषणाचे, शोषणकर्त्याचे आणि शोषणकारी व्यवस्थेचे निर्दालन केले नाही. तर खर्‍या अर्थाने अहिंसा रुजत नाही व करुणेला अर्थ उरत नाही अशी भुमिका तुकाराम घेतात आणि आपले नाते थेट बुद्धाशी जोडतात.
आपण कुणबी म्हणून जन्माला आलो यासाठी देवाचे ते आभार मानतात. डॉ.आ.ह.साळुंखेनी याचे फार चांगले विवेचन केले आहे. ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यानंतर  थोडीबहूत पुस्तकी विद्या मिळते आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत याचा गर्व ब्राह्मणाला असतो. या गर्वामुळेच माणूस संताच्या सेवेला म्हणजेच सदगुणी माणसांच्या सहवासाला मुकतो. त्यामुळे त्याला खरेखुरे माणूसपण लाभू शकत नाही. ही विनाकारण झालेली नागवण होय. नागवण हा मार्मिक शब्द तुकाराम वापरतात. माणसाला अत्युच्च शिखरावर घेऊन जाणारे सदगुण हे माणसाच्या दृष्टीने वस्त्रासारखेच असतात. ब्राह्मण्याचा अहंकार विद्येची घमेंड इत्यादींमुळे जणूकाही माणसाचे हे वस्त्रच हिरावले जाते. माणसाला नग्न बनविण्याचा ब्राम्हण्याची आपल्याला अजिबात अभिलाषा नाही. कुणबी म्हणून जन्माला आलो. ही फार चांगली गोष्ट झाली. नाहीतर दंभानेच मेलो असतो आणि निर्वाण प्राप्तीपासून दूर राहिलो असतो असे तुकारामांना वाटते.
तुकाराम म्हणतात, स्पर्शाने नव्हे तर संकुचित विचारांनी विटाळ होतो. परद्रव्य व परनारी यांच्याशी संपर्क करणे हाच खरा विटाळ. मनातील विचार व वासना यांचा त्याग न कराआता केवळ मुंडन करुन काय उपयोग? यज्ञयाग करणारे श्रोतिय ऋत्विज पुण्याची विक्री करुण दक्षिणा मिळवितात. पण प्रत्यक्षात ते मातृगमणासारखे पाप आहे. भाड खाण्यासारखे हे धन म्हणजे विटाळ होय. जीवंतपणी भुकेलेल्या माणसाला अन्न देत नाही मात्र मेल्यावर पींडदान देतात. ही तर फसवाफसवी आहे. नवसाने मुले होतील तर मग नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्नही ते विचारतात.
आम्हाला वनात जाण्याचे कारण नाही, जनातच विजनाचा आम्हाला अनुभव येतो असे सांगत तुकाराम आपले नाते थेट बुद्धाशी सांगतात.
दुसर्‍या बाजूला बाह्मणी संतांनी समतेला स्पष्टपणे नकार दिला आहे.  तुकारामांवर टिकाही केली होती. रामदास म्हणातात,
नीच प्राणी गुरुत्व पावला।
तेथे आचारचि बुडाला।
वेद शास्त्र ब्राह्मणाला। कोण पुसे?
तुकाराम शुद्र वर्गातील असूनही श्रेष्ठत्वाला पोहोचले. जगदगुरु झाले त्यामुळे ब्राह्मणी संस्कृती बुडाली. वेद्शास्त्र जाणणार्‍या ब्राह्मणाला आता कोणी विचारीत नाही अशी तक्रार रामदासांनी केली आहे.
अंत्यज शब्द ज्ञाता बरवा।
परी तो नेऊन काय करावा?
ब्राह्मण सान्निध्य पुजावा।
हे तो न घडे कि।
अंत्यज म्हणजे अस्पृश्य शब्द फार प्रचलित झाला आहे. अस्पृश्यही प्रगती साधत आहेत. पण म्हणून त्यांना काय डोक्यावर घ्यायचे आहे? ब्राह्मणाच्या बरोबरीने त्यांना वागवता येणार नाही असे रामदास म्हणत आहेत.
अंत्यज एक तो खरे। परि सांगाते घेऊ नये ती महारे॥
पंडीत आणि चाटे पोरे। एक कैसी?
मनुष्य आणि गधडे। राजहंस आणि कोंबडे॥
राजे आणि माकडे। एक कैसी?
भागिरथीचे जळ आप। मोरी संवदिणी तो ही आप
कुश्चिळ उदक अल्प। सोसवेना॥
आत्मा एक असला तरी ब्राह्मण आणि शुद्रातिशुद्र एक होऊ शकत नाहीत. ब्राह्मण श्रेष्ठ व इतर सर्वांना गाढव, माकड, कोंबड्या, चावट, गटाराचे पाणी इ. उपमा देऊन रामदासांनी हिणवले आहे. अशाप्रकारे ब्राह्मणी संस्कृतीच्या हट्टापायी ब्राह्मणांना श्रेष्ठ व इतरांना नीच म्हणून समतेला नकार दिला आहे.
याउलट संत सेना महाराजांनी तेराव्या शतकातच ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले.
व्यर्थ कासायसि नावे। उगे चि धोकुनि मरावे ॥1॥
एक विठठलावाचुन। आणिक ना बा साधना॥2॥
वेदशास्त्र जाणितले। व्यर्थ अभिमानाने मेले ॥3॥
झाली पुराण उत्पती। मग अभिमानाने फुंदतीए।।4॥
ऎसे व्याधिचि शिणले। सेना म्हणे वाया गेले ॥5॥
वेदशास्त्राच्या अह्ंगडाने काहीजण फुकट मरतात तर काही गर्वाने फुगतात. अशा रोगांनी जर्जर झाले आणि ते वाया गेले असे सेना महाराज येथे म्हणतात.
चोरी करुनिया बांधले वाडे। झाले ते उघडे नांदत नाही ॥1॥
वेश्या होऊनिया मिळविले धन। असता अवगुण लया गेले ॥2॥
मदिरा जुगार करी परद्वार। दारिद्र्य बेजार दु:ख भोगी॥3॥
सेना म्हणे त्रासून फिरतो हो जनी। मग चक्रपाणी भजू पाहे ॥4॥
येथे संत सेना महाराज पंचशील तोडले तर माणूस कसा दारिद्री होऊन दु:ख भोगतो ते सांगत आहेत. आणि सर्व प्रकारचे थकल्यावर नागवल्यावर माणूस देव पुजेला लागलो. याबद्दल सेना महाराज निषेध करीत आहेत. अशाप्रकारे बुद्धाचीच वाणी तेराव्या शतकात जनमाणसांपर्यंत नेण्यासाठी संत सेना महाराज पंजाब पर्यंतही गेले. त्यांचे अभंग मराठी बरोबरच हिंदी व पंजाबी, राजस्थानी भाषेतही आहेत. संत सेना महाराज हे ज्ञानेश्वरांचा जन्म 1275चा. त्या अगोदरच पिढी 25वर्षांनी मोठी गृहित धरली तरी संत सेना महाराजांचा जन्म 1250 च्या पुर्वाचा ठरतो. ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अगोदर त्यांनी विठठलाची म्हणजे पंढरपुरची वारी केलेली आहे. म्हणूनच ज्ञानियाने रचला पाया। तुका झालासी कळस हे विधान खोटे ठरते. खरे तर संत सेनाने रचिला पाया। तुका झालासे कळस हेच विधान बहुजन चळवळीच्या समतेच्या संघर्षातील योग्य विधान ठरेल.
ज्ञानेश्वरांनी आपले अखंड आयुष्य स्वत:ला ब्राह्मण म्हणून स्वीकारले जावे यासाठी खर्ची घातले. विठठल कुलकर्ण्याला बहिष्कृत केल्यामुळे आपल्यावरील हा बहिष्कार उठविला जावा व पुन्हा आपल्याला ब्राह्मण मानले जावे, ब्राह्मण जातीत घ्यावे यासाठी ज्ञानियाने आळंदि पैठण इत्यादी ठिकाणच्या ब्राह्मण श्रेष्ठांना व ब्राह्मणसभांना साकडे घातले. ती लढाई शेवटी त्यांना जिंकता आली नाही. जन्मजात ब्राह्मण्याला त्यांनी श्रेष्ठ मानले. ब्राह्मणी संतानी ब्राह्मण्य टिकवण्यासाठी कार्य केले. संत सेनापासून तर संत तुकारामापर्यंत बहुजन संतांनी बुद्धप्रणित समतेसाठी संघर्ष केला.
विठ्ठल हा बुद्धच आहे असे बाबासाहेब म्हणतात.बुद्धाचे ब्राह्मणीकरण करुन पंढरपुरचे बौद्धस्थळ सुद्धा ब्राह्मण बडव्यांनी हाती घेतले. परंतु जाणिवेतून किंवा नेणिवेतून पंढरपुर बौद्ध स्थळाला भेट देण्याची पूर्वापार पद्धत महाराष्ट्रातील बहुजन संतांनी आणि वारकर्‍यांनी चालू ठेवली ती आजतागायत सुरु आहे. हे खरे असले तरी वारकरी पंथामध्ये जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा, रुढीप्रियता या घात गोष्टींनी पुन्हा ठाण मांडले आहे. व्यक्ती व समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक अशा सर्वांगिण शोषणाविरुद्ध संघर्ष करुन व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समाज व राष्ट्राचे ऎक्य व एकात्मता यांच्या प्रस्थापनेसाठी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाला युद्ध पुकारावे लागेल. तरच संत तुकाराम महाराजांना खरे अभिवादन केल्याची व आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती अनुभवता येईल.
------ प्रा. प्रेमरत्न चौकेकर
रिपब्लिकन जन आंदोलन या ब्लॉगवरून साभार
नियमित वाचा  रिपब्लिकन जन आंदोलन- http://www.rjaandolan.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.