रविवार, ८ एप्रिल, २०१२

सत्यपाल महाराज

सत्यपाल महाराज हे आधुनिक काळाचे संत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रखर वाणी आणि खंजीरीच्या क्रांतीदर्शी बोलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांची मने पेटविली. महाराजांच्या खंजीरीचे बोल ज्यांच्या कानी पडले त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. त्यांचा सहवास लाभलेले सत्यपाल महाराज हे विदर्भातील अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील सिरसोली नावाच्या लहानश्या गावातील गरीब घरात जन्माला आले. घरात अठरा विश्‍व दारिद्य्र, पिढीजात शिंप्याचा व्यवसाय करणारे वडिल विश्‍वनाथ तर आई सुशिला आपल्या संसाराला मदत म्हणून दिवसभर डोक्यावर टोपलं घेऊन काही-बाही जिन्नस विकायची.

एका सामान्य घरातल्या सत्यपाल महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सत्यपाल महाराजांनी आतापर्यंत १२ हजार कीर्तन केली आहेत. शिवाजी, ङ्गुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, कबीर, तुकाराम, नामदेव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या विचारांचा वारसा समाज प्रबोधनाचं काम ते अविरत करीत आहे.

किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या रोजच्या जीवनातले प्रसंग, साधी सरळ लोकभाषा, सामान्य माणसाला येणारे अनुभव, प्रसंग, ताज्या घडामोडींवरील चपखल बसणारी सिनेमांची गाणी, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील विसंगती-सुसंगतीने मांडणारे, अंधश्रद्धा, परंपरा, जगण्यातले विरोधाभास, व्यसन यावर प्रखर भाष्य करुन लोकजागृतीचं कार्य सत्यपाल चिंचोळकर करीत आहेत.

त्यांचे कीर्तन महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातही गाजले आहे. व्यसनमुक्ती, हुंडा निर्मुलन, साक्षरता प्रचार, अंधश्रद्धा निर्मुलन, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण जागृती, देहदान, रक्तदान, जातीभेद निर्मुलन यावर प्रखरपणे बोलुनच थांबत नाही तर, १६ मे या आपल्या वाढदिवशी ते कुठेही असले तरी अन्नदान, विधवा महिलांना सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश-पुस्तके वाटप करतात. दारिद्य्र, कर्ज, बेकारी यांनी खचून आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यांना सत्यपाल महाराज शेतीचे नवनवीन प्रयोग करायला सांगतात. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या संत वचनाचा आदर करीत सत्यपाल महाराजांनी स्वत:चा विवाह सामुदायिक पद्धतीने लावून घेतला. त्यांच्या धर्मपत्नी सौ.सुनंदा या त्यांच्या कार्यावर खुश आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सामुदायिक विवाहाचे पुरस्कर्ते होते. तोच वारसा पुढे चालवत सत्यपाल महाराज दरवर्षी सर्व जाती-धर्मीयांसाठी २१ मे रोजी सामुदायिक विवाह लावून देतात. आतापर्यंत एक हजार लग्ने त्यांनी स्व:खर्चातून लावून दिली आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने २००९ मध्ये त्यांना ‘राज्य व्यसनमुक्ती पुरस्कार’तसेच २००९-१० चा ‘दलित मित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, विदर्भ रत्न पुरस्कार, राष्ट्रीय सेवाभावी पुरस्कार, राष्ट्रसंत सेवाव्रती पुरस्कार, धन्यगृहस्थाश्रम पुरस्कार, अहमदपूरचा सेवागौरव पुरस्कार, राष्ट्रीय ग्रामदूत पुरस्कार, वामनदादा करंडक पुरस्कार, अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेचा पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार असे २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाची ‘म्युझिक कॉस्ट’ कंपनीने १२ ऑडियो सीडी, २ डिव्हीडी, ३ एमपीथ्री सीडीज काढल्या आहेत. सत्यपाल महाराज एकाचवेळी ९ खंजिरी वाजवितात आणि त्यातून ११ आवाज काढतात. सध्यातरी एकाचवेळी एवढ्या खंजिरी वाजविणारे ते एकमेव आहेत.

प्रस्तुत प्रतिनिधीने सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाचा प्रवास जाणून घेतला असता ते म्हणाले की, वयाच्या १४ व्या वर्षापासून गुरुदत्त सेवा मंडळातील भजनी मंडळात गायन करण्यासाठी जात होतो, त्यातच रममाण झालो. जीवनातील दारिद्य्र, व्यवहार यावर विचार करत शब्दाला शब्द जुळवत मार्मिकपणे प्रबोधनाला प्रारंभ झाला. १९७० पासून आधुनिक कीर्तन करण्यात सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता लोकांसमोर मांडू लागलो. जगण्यातील स्पर्धा, बदललेली संस्कृती, घराघरातील वाद, घराबाहेर काढले जाणारे वृद्ध आई-बाप पाहून मन अस्वस्थ व्हायचे. तिच अस्वस्थता शब्दातून प्रकट होते. याकामी मला साथ-संगत करण्यासाठी मला ज्यांचं सहकार्य लाभतं त्यांचा उल्लेख करणे मला महत्वाचे वाटते. किर्तनात बाईचा आवाज काढणारा माझा चुलत भाऊ गजानन चिंचोळकर हा माझा उजवा हात आहे. तसेच तबला वादक रामाजी तांबटकर, साथ-संगत करणारे सुनील चिंचोळकर, वाहनचालक राजेश असा पाच लोकांचा आमचा एक समुह आहे. किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा अंतिम श्‍वासापर्यंत सुरु ठेवायचा आहे. त्यातून मिळणारा पैसा हा समाजासाठीच खर्च करीत असतो. गडचिरोली येथे मिळालेला ११ हजार रुपयांचा पुरस्कार तेथीलच आदिवासींना वाटून दिला. सिरसोली येथे आश्रम तयार केला आहे. २२ जानेवारी २०११ ला कपडे वाटायचे आहे. आईच्या नावाने अकोट ते अकोला रुग्णवाहिका सुरु केली आहे. माझ्या आईला नेहमी असे वाटत होते की माझं पोरगं माले टिवीवर केव्हा दिसनं? परंतु ते स्वप्नही झी टीव्ही व स्टार माझा या वृत्तवाहिनीने पूर्ण केले. मी देहदान करण्याचा संकल्प केला असून माझी समाधी बांधू नका, माझी पूजा करु नका. तसे केले तर मी केलेल्या कार्यावर पाणी ङ्गेरेल. अशी भावना महाराजांनी व्यक्त केली.

भावी पिढीविषयी बोलतांना ते म्हणाले की, आताची पिढी एैदी आहेत. शिक्षणाच्या नावाखाली भलतीच कामे करतात. मोठे झाल्यावर आई-बापाला लाथा घालतात. त्यासाठी एकच सांगतो ‘माय-बाप हो दारु पिऊ नका, त्यानं संसाराचा नाश होतो, दारुला जात नसते, मुसलमान लोक दारु पित नाही, मारवाडी समाज दारु पित नाही म्हणून तो समाज पुढे जात आहे.’ सांगा बरं, मुसलमान समाजात आतापर्यंत जीवनाला कंटाळून कोणीच आत्महत्त्या केल्याचे ऐकिवात नाही. कारण ते जन्माला येताबरोबर मिळेल ते काम करायला तयार असतात. त्यांना काम करायची लाज वाटत नाही. मी स्वत: रिकाम्या वेळेत कपडे विकतो. दारु पिणार्‍यांच्या बाटलीचे बुच जमा करतो आणि ते विकतो. मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. आज माझा मुलगा धर्मपाल हा बीएएमएस चे वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन बालरोग तज्ज्ञाचे पुढील शिक्षण घेत आहेत. हिच माझी खरी संपत्ती आहे. मला दुसर्‍या संपत्तीचा हाव नाही. समाज प्रबोधनातच उरलेलं आयुष्य घालवायचं आहे. गावात आश्रम सुरु करुन माझा वारसा चालविण्यासाठी किर्तनकार घडवायचे आहे हे माझे किर्तनरुपी आंदोलन आहे. शेवटी एकच सांगायचे आहे, ‘बापहो ! टाकाऊपासून टिकाऊ आणि ङ्गेकाऊपासून विकाऊ’ असे काम करा. म्हणजे जीवनात हमखास यशस्वी व्हाल.

मित्र-मैत्रिणीनो "WWW.YOUTUBE.COM" या साईड वर ' सत्यपाल महाराजांच्या ' कीर्तनाची VIDEO'S आपणास सापडतील एकवार नक्की ऐकाचं...

सत्यपाल महाराज हे आधुनिक काळाचे संत आहे हे नाकारता येणार नाही.
सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनात सागतात ..

" संताच्या शिकवणीवर चालून जीवनात परिवर्तन आणा, संततीसाठी संपत्ती जमा करू नका, संपत्ती कमावणारी संतत्ती पैदा करा, नसेल तर वांझ राहिले तरी चालेल,
पुतळे कमी बांधा पण तलाव बांधा, पाणी आडवा, पाणी जिरवा, नाही तर एकमेकांची जीरवा ".

त्यांच्या कार्यास व भावी वाटचालीस शुभेच्छा ! महाराजांनी सुरु केलेलं प्रबोधन, जनजागृतीच्या व्रताला कुणीही थांबवू शकणार नाही, पण वैज्ञानिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती होऊनही माणूस माणसापासून, समाजापासून झपाट्याने बाजूला जात आहे. अशावेळी एकटे सत्यपाल महाराज परिवर्तनाचं काम किती करणार? त्यासाठी चोखाळलेल्या प्रबोधनाच्या वाटेवर दोन पाऊलं टाकता आली तर बघा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.