मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

तथाकथित उधळपट्टी आणि अर्थ व्यवस्था

महावीर सांगलीकर यांच्या महाविचार या ब्लॉगवरून साभार.......

त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...http://mahavichar.blogspot.in/.....

तथाकथित उधळपट्टी आणि अर्थ व्यवस्था

 -महावीर सांगलीकर

सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून लग्न, वाढदिवस यासाठी होणा-या उधळपट्टीवर मोठा वाद चालू आहे. खरे म्हणजे ही तथाकथित उधळट्टी अर्थव्यवस्थेला चालना देत असते. एखादी  धनदांडगी व्यक्ती आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात जेंव्हा  २ कोटी रुपये खर्च करते, तेंव्हा ती हे पैसे हवेत उडवत नसते. पडून असलेले हे पैसे शेकडो लोकांमध्ये त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वितरीत होतो. लग्नात खर्च होणारे पैसे मंगल कार्यालय, कापड दुकानदार, ज्वेलर्स, केटरिंगवाले, मंडपवाले, स्टेज  डेकोरेशनवाले, साउंड सिस्टीमवाले, वाजंत्रीवाले, फोटोग्राफर अशा शेकडो उद्योजकांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहचतात. हे उद्योग चालले तरच या उद्योजकांवर अवलंबून असणा-या हजारो लोकांची पोटे  भरू शकतात.

समजा एखाद्या व्यक्तीने लग्नासाठी सुमारे १० लाख रुपयांचे कपडे खरेदी केले, तर हे १० लाख रुपये त्या एकट्या कापड दुकानदाराच्या खिशात जात नाहीत. या पैशातील मोठा हिस्सा कापड गिरणीकडे जातो. कापड दुकानदाराकडे उरलेल्या पैशातून त्या दुकानात काम करणा-यांचे पगार, दुकानाचे भाडे, वीज बिल अशा गोष्टी दिल्या जातात. कापड गिरणी चालली तरच त्या कापड गिरणीतील हजारो कामगारांचे पोट भरणार असते. असाच प्रकार मंगल कार्यालय, ज्वेलर्स, केटरिंगवाले, मंडपवाले, स्टेज  डेकोरेशनवाले, साउंड सिस्टीमवाले यांच्या बाबतीतही होत असतो. केटरिंग सेवा पुरवणारे अनेकांना रोजगार देत असतात. अगदी मोठ्या लग्नातील एखादा फोटोग्राफर देखील किमान ७-८ जणांना प्रत्यक्ष रोजगार देतो.

अर्थव्यवस्था चालू ठेवायचे हे काम या प्रत्यक्ष रोजगार निर्मितीपुरतेच नसते. अशा लग्नाला हजारो लोक येतात. तेही कपडे, वहातूक, भेट वस्तू अशा अनेक कारणांसाठी खर्च करतात. त्यामुळेही अर्थव्यवस्था चालू रहाते. या सगळ्या गोष्टींतून बाजारात पैसा खेळता रहातो. त्यातूनच नगर पालिका, राज्य सरकार आणि  पासून केंद्र सरकार यांच्या तिजोरीत वेगवेगळ्या करांपासून येणारा पैसा जमा होतो. त्यात जकात, व्यवसाय कर, सेवा कर, आय कर वगैरेंचा समावेश असतो.

 जर अशी तथाकथित उधळपट्टी करणारी लग्ने  झालीच नाहीत तर ते अर्थव्यवस्थेला मारक ठरेल. धन दांडग्यांचा पैसा तसाच पडून राहील. त्यांचा त्यांनाही उपयोग नाही आणि समाजालाही नाही अशी अवस्था तयार होईल. हे म्हणजे दुष्काळात तेराव्या महिन्याला आमंत्रण दिल्यासारखे होईल.

या गोष्टींचे काय?
अर्थात या गोष्टी साम्यवादी विचार सरणीला  बळी पडलेल्या अनेकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे मला त्यांना कांही प्रश्न विचारावेसे वाटतात. पहिला म्हणजे देशभर दारू पिण्यावर अब्जावधी रुपये खर्च केले जातात. या उधळ पट्टीच्या विरोधात हे लोक कधीच आवाज का उठवत नाहीत? हे अब्जावधी रुपये दुष्काळ हटवण्यास  उपयोगी पडणार नाहीत का? तसेच देशभर सर्व धर्मियांच्या मंदिरांमध्ये प्रचंड संपत्ती पडून आहे, ती संपत्ती दुष्काळ हटवण्यासाठी उपयोगी पडेल, त्याबद्दल हे लोक कांहीच का बोलत नाहीत? केवळ धनदांडग्यांनी केलेली उधळ पट्टीच यांना कशी काय दिसते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.