सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

मराठे आणि मराठा ब्रिगेड

 आजच्या दैनिक पुण्यनगरीचा संपादकीय लेख वाचा पान नं. ४ वर.                           सर्जनशील सारस्वतांनी आणि महान संत-महात्म्यांनी मराठी साहित्याची श्रीमंती वृद्धिंगत केली त्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची 86 वी निवडणूक या प्रक्रियेतील एक उमेदवार ह. मो. मराठे यांच्या पत्रकबाजीमुळे मुद्दय़ावरून गुद्दय़ापर्यंत ताणली जाऊ लागली आहे. ह. मो. मराठे यांना ही निवडणूक लढवण्याला कोणाचा विरोध नाही. त्यांनी तद्नुषंगाने काय प्रचार करावा हा त्यांचा भाग झाला, पण त्यांनी 'जात'वादाला हात घालून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जेम्स लेन या वादग्रस्त साहित्यिकाचा आपल्या पत्रकात जो उल्लेख केला तो आक्षेपार्हच मानावा लागेल. मग भलेही ह. मो. मराठे स्वत:ला किती विद्वान समजोत. अर्थात त्यांच्या साहित्यिक पत्रकारितेचा इतिहास आणि त्यांचे वैयक्तिक जीवन कोणाला माहीत नाही अशा भ्रमात त्यांनी वावरू नये. चार्त्यिाचे दाखले देणार्‍यांनी स्वत:ला जरा आरशात पाहावे म्हणजे आपले प्रतिबिंब काय दर्शवते, याचा बोध होईल आणि नंतरच जेम्स लेन न्याहाळावा. या जेम्स लेनने महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी बदनामी केली ती कोर्टाने क्षम्य करो अगर न करो, ती मराठा समाज व महाराष्ट्र मान्य करणार नाही. ह. मो. मराठे यांनी त्या जेम्सला या निवडणूक प्रचारात आणायलाच नको होते. त्यांनी तसे अनाहुतपणे की मुद्दामहून केले हा संशोधनाचा वेगळा भाग, पण त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आवाज उठवणे क्रमप्राप्तच ठरते. मराठा समाजाच्या अस्मितेला कोणी आडमार्गाने हात घालणार असेल तर त्याच्याशी दोन हात करण्याची संभाजी ब्रिगेड म्हणजे मराठा ब्रिगेडची तयारीच असते. हे त्यांनी वेळोवेळी अनेक गुन्हे आणि केसेसे अंगाखांद्यावर घेऊन दाखवून दिले आहे. 'पहिला चहा'साठी बोरू अन् टाक घासणे आणि मराठी व मराठा अस्मितेसाठी पोलिसांचे दंडुके अंगावर झेलणे यात जमीन-आसमानाचा फरक असतो. हे सुद्धा ह. मो. मराठे यांनी लक्षात घ्यावे. या अगोचरपणामुळे ह. मो. मराठे विरुद्ध संभाजी ब्रिगेड असे रण पेटले. मराठी साहित्य ही काही विशिष्ट समाज अथवा व्यक्तींची मक्तेदारी नाही. हा सार्वजनिक मामला आहे, म्हणूनच संभाजी ब्रिगेड या संघटनेने या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून ह. मो. मराठे यांनी माघार घ्यावी, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर ते अध्यक्षपदी निवडून आले तरी काम करू देणार नाही. राज्यात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. खरे तर आक्रस्ताळेपणा करणार्‍यांना हे चोख प्रत्युत्तर मानावे लागेल. कोणी प्रस्थापित कायदे आणि विद्वत्तेच्या आड लपून अस्मितेवर घाला घालत असेल, तर त्यांना अशाच पद्धतीने वठणीवर का आणू नये? इतिहासाचे विकृतीकरण करून आपले पोट भरण्याचे दिवस संपलेत. बहुजन समाज सुद्धा आता केवळ साक्षरच नव्हे तर विद्वान झालेला आहे. तेव्हा क्षुद्र स्वार्थापोटी कोण काय करतो, त्यासाठी कसा प्रचार केला जातो याचे त्याला आकलन होते. म्हणूनच संभाजी ब्रिगेड पेटून उठली. संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना ह. मो. मराठे यांनी स्वत:कडे चार बोटे दर्शवली जातात, हे सोयिस्कररीत्या विसरू नये. त्यांच्या नैतिकतेचा इतिहास सर्वश्रुत आहे. ह. मो. मराठे यांची भूमिका आणि पवित्रा योग्य असता तर तमाम साहित्यिकांनी त्यांची पाठराखण केली असती, पण तसे घडले नाही. उलटपक्षी 'च्यायला, हमो तुम्हीही तसेच निघालात हो,' अशी नामदेव ढसाळ यांच्यावर म्हणण्याची वेळ यावी हे कशाचे द्योतक आहे? ह. मो. मराठे ब्राह्मण असल्याने जातप्रणीत आवाहन करत असतील तर संभाजी ब्रिगेडही मराठा ब्रिगेड असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर बोटे मोडण्यात काय हशील? ह. मो. मराठे यांचा चुकीचा पवित्रा दिसतो, मराठी ब्रिगेडचा नव्हे. तेव्हा साहित्यिक म्हणवणार्‍या ह. मों.नी सामाजिक अवधान राखून बदनामीपूर्वीच समाजहिताची भूमिका घ्यावी आणि मराठा ब्रिगेडने मराठी साहित्याची बूज राखण्याखातर एक वेळ त्यांना माफ करावे.                                    मूळ लेख येथे वाचा - http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=9/10/2012%2012:00:00%20AM&queryed=10&a=4&b=66540          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.