सोमवार, २१ मे, २०१२

इतिहासातील बनावटीकरणावर महात्मा फुलेंचे विचार..


८) महात्मा फुलेंनी इतिहासातील घुसखोरी  बद्दल, आगन्तुकी करणाबद्दल  , बनावटी करणा बद्दल एका पत्रात उल्लेख केलेला आहे...
मामा परमानंद यांस पत्र.....................
------------- मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
.........राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर
......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.
..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरापाडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही. 
.........आठ वर्षी जेव्हा मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलो होतो, तेव्हा पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास क्षुद्र शेतकऱ्यांचे दैन्यवाण्या स्थितीचा काही देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केले होते. ते त्या देखाव्याचे असूड या नावाचे तीन वर्षापूर्वी एक पुस्तक तयार केले होते व त्याची एकेक प्रत आपले कलकत्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल (साहेब?) श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या क्षुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एके बाजूला ठेविले आहे. असुडाची प्रत आपल्यास पाहण्याकरिता पाहिजे त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्याची नकळ करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारे एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावे लोभ असावा हे विनंती.

------------------------------- आपला --------- 
.........................................................................जोतीराव गोविंदरावफुले.
संदर्भ-------  महात्मा फुले  समग्र वांग्मय
==============================================================
माझे मत -- बघा मित्रांनो... वरती महात्मांनी नमूद केलेल्या पोवाड्यांची तुलना आजकालच्या काळातील पुस्तकांशी करा.... त्यावेळेसचे हे पोवाडे म्हणजे आज कालची रामदास स्वामींना , दादोजी कोंडदेवांना अनायासे जास्त महत्व देणारी , ओढून ताणून गुरुपदावर जाणीवपूर्वक न्हेऊन बसवणारी ती पुस्तके म्हणजेच महात्मा फुलेंना अपेक्षित असलेली बनावट पोवाडे असे आपण समजू शकतो... 
आणि हि अशी पुस्तके ज्या मध्ये --- शहाजी महाराजांना सातत्याने स्वराज्याच्या चौकटीपासून दूर ठेवणे, शिवाजी महाराजांचे कर्तुत्व इतर कोणाला म्हणजे दादोजी / रामदास अश्या बनावट / (बनवलेल्या ) गुरूंना देणे..., अथवा.. शिवरायांना देवाचा अवतार दाखवून सगळे श्रेय देवाच्या नावावर खपवणे..., शिवरायांना मुसलमान द्वेष्टा म्हणून रंगवणे..., अश्या प्रकारच्या चुकीच्या समजा पसरवल्या जातात  ; त्या पुस्तकांपासून सर्व शिव भक्तांनी सावध राहिले पाहिजे... शिवरायांचा उधो उधो करायचा.. आपण शिवरायांचे निस्सीम भक्त आहे असे दाखवायचे आणि मग हळू हळू भक्तीच्या नावावर हे असले धंदे करायचे...अश्या धूर्त लोकांपासून खऱ्या आणि निस्वार्थी शिवभक्तांनी सांभाळून राहायला हवे... कादंबऱ्या वाचून स्वतःचे इतिहासाबद्दल ठाम मत बनवू नये.. तसेच कुठल्यातरी एकाच प्रकारचे ऐतिहासिक  पुस्तक वाचून स्वतःचे इतिहासाबद्दल ठाम मत बनवू नका.. कारण एकाने चुकीचे ठाम मत बनवले आणि तेच त्याने आपल्या जवळच्या मित्र परिवाराला सांगितले तर त्या मूळे चुकीचे समज  पसरत जाऊ शकतात .. आणि त्यातूनच चुकीच्या इतिहासाच्या प्रसाराला चालना मिळत असते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.